परभणी : मनपातील १३ नगरसेवकांच्या पवित्र्याने राष्ट्रवादी काँग्रेसची डोकेदुखी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 11:57 PM2019-03-06T23:57:36+5:302019-03-06T23:58:01+5:30
येथील महानगरपालिकेतील १३ नगरसेवकांनी पक्ष नेतृत्वाविरोधात पुकारलेली बंडाची भूमिका कायम असल्याने ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस परभणीत अडचणीत आली आहे़ राष्ट्रवादीतील बंडाळीची बाब शिवसेनेच्या पथ्यावर पडणारी आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील महानगरपालिकेतील १३ नगरसेवकांनी पक्ष नेतृत्वाविरोधात पुकारलेली बंडाची भूमिका कायम असल्याने ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस परभणीत अडचणीत आली आहे़ राष्ट्रवादीतील बंडाळीची बाब शिवसेनेच्या पथ्यावर पडणारी आहे़
परभणी महानगरपालिकेतील एका स्वीकृत सदस्य पदावरून गेल्या दोन महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेला वाद मिटता मिटत नसल्याचे दिसून येत आहे़ मंगळवारी राष्ट्रवादी अर्बन सेलच्या वतीने आयोजित कार्यशाळेस शहरातील सर्व नगरसेवकांना बोलावूनही ‘त्या’ १३ नगरसेवकांनी पक्ष नेत्यांचा आदेश डावलून दांडी मारली़ विशेष म्हणजे या दिवशी एकीकडे राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी कार्यशाळेत असताना दुसरीकडे याचवेळी या १३ नगरसेवकांच्या गटाची महानगरपालिकेत बैठक झाली़ या बैठकीत अॅड़ स्वराजसिंह परिहार यांना शहराध्यक्ष पदावरून दूर करण्याचा पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय अन्यायकारक असून, परिहार यांना जोपर्यंत न्याय दिला जाणार नाही, तोपर्यंत पक्षासोबत न राहण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला़ या १३ नगरसेवकांनी अगोदरच मनपातील गटनेता बदलला आहे़ शिवाय मनपातील १८ पैकी तब्बल १३ नगरसेवकांचा गट झाल्याने त्यांना पक्ष विरोधी कारवाई केल्याचा फटकाही बसणार नाही़ त्यामुळे पक्षाने कोणतीही कारवाई केली तरी परिहार यांच्या पाठीशी उभे राहूत, अशी भूमिका या नगरसेवकांनी घेतली आहे़ त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गोची झाली आहे़ राष्ट्रवादीतील ही बंडाळी शिवसेनेच्या पथ्यावर पडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे़ या १३ नगरसेवकांची समजूत न काढल्यास राष्ट्रवादीला शहरात फटका बसण्याची शक्यता आहे़ त्यामुळे या नगरसेवकांची समजूत काढावी तरी कशी असा पेच पक्षातील अन्य नेत्यांसमोर उभा राहिला आहे़
स्वराजसिंह परिहार यांना मुंबईला बोलावले
माजी शहराध्यक्ष अॅड़ स्वराजसिंह परिहार यांनी आपल्यावर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केल्याने त्यांना प्रदेशाध्यक्ष आ़ जयंत पाटील व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ८ मार्च रोजी मुंबई येथे चर्चेसाठी बोलावले आहे़ तशी माहिती अॅड़ परिहार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ त्यामुळे गुरुवारच्या बैठकीत परिहार यांची समजूत काढण्यात पक्ष नेतृत्वाला यश येते की नाही, याविषयी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे़ विशेष म्हणजे मनपातील १३ नगरसेवकांनी ११ मार्चपर्यंत परिहार यांना न्याय न दिल्यास लोकसभा निवडणुकीत वेगळी भूमिका घेतली जाईल, असा इशारा मंगळवारच्या बैठकीत दिला आहे़