परभणी : जागा कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादीकडून व्यूहरचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:22 AM2018-04-10T00:22:27+5:302018-04-10T00:22:27+5:30
परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेची राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली जागा कायम ठेवण्यासाठी या पक्षाकडून व्यूहरचना आखली जात असून त्या दृष्टीकोनातून या पक्षाच्या जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची रविवारी नांदेडमध्ये भेट घेतली. दुसरीकडे विरोधक असलेल्या भाजपाकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत निर्णय झाला नसल्याने पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेची राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेली जागा कायम ठेवण्यासाठी या पक्षाकडून व्यूहरचना आखली जात असून त्या दृष्टीकोनातून या पक्षाच्या जिल्ह्यातील तिन्ही आमदारांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांची रविवारी नांदेडमध्ये भेट घेतली. दुसरीकडे विरोधक असलेल्या भाजपाकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याबाबत निर्णय झाला नसल्याने पक्षाचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
परभणी- हिंगोली स्थानिक स्वराज्य संस्थेचे आ.बाबाजानी दुर्राणी यांचा कार्यकाळ २१ जून रोजी संपणार आहे. तत्पूर्वी रिक्त होणाऱ्या या जागेसाठी येत्या १० ते १५ दिवसांत निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही जागा कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून सावध हालचाली करत व्यूहरचना आखली जात आहे. त्या दृष्टीकोनातून आ.दुर्राणी यांनी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या सदस्यांसह इतर सदस्यांशीही संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. राज्यस्तरावरील धोरणात्मक निर्णयानुसार काँग्रेस- राष्ट्रवादी हे स्थानिक स्वराज्य संस्था गटातील निवडणुका आघाडीकरुनच लढणार असल्यामुळे परभणीची जागा राष्ट्रवादीकडेच कायम राहणार असल्याचे समजते. त्यामुळे काँग्रेसची पुरेपुर साथ मिळावी, या दृष्टीकोनातून राष्ट्रवादीकडून प्रयत्न केले जात आहेत. दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद येथे एका कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण व आ.बाबाजानी दुर्राणी यांची भेट झाली. या भेटीत या निवडणुकी संदर्भात ओझरती चर्चा झाली. त्यानंतर ८ एप्रिल रोजी आ.दुर्राणी, आ.विजय भांबळे, आ.डॉ.मधुसूदन केंद्रे या राष्ट्रवादीच्या तिन्ही आमदारांनी नांदेड येथे खा. चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सकारात्मक चर्चा झाल्याचे समजते. लवकरच या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होणार असल्याने आ.दुर्राणी यांनी मतदारांशी संवाद वाढविण्यास सुरुवात केली आहे. शिवाय परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये एकूण ५०२ मतदारांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसकडे सर्वाधिक म्हणजे १६२ आणि काँग्रेसचे १३५ असे २९७ चे संख्याबळ आहे. शिवाय इतरही काही मतदार त्यांच्या संपर्कात असल्याचे समजते. शिवसेना वगळता राष्टÑवादीचे संख्याबळ ३४० पर्यंत जाईल, असे या पक्षाच्या नेत्यांना वाटत आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपाकडे असलेल्या या जागेवर दुर्राणी यांच्या विरोधात भाजपाकडून कोण उमेदवार असणार, हे मात्र अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे भाजपाचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. परभणी जिल्ह्यात भाजपाचे २० व हिंगोली जिल्ह्यात ३१ असे एकूण ५१ मतदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या तुलनेत भाजपाची फारसी ताकद नसली तरी दोन्ही जिल्ह्यातील शिवसेनेचे एकूण ९७ मतदार भाजपला मदत करतात की नाही, हे ही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण भाजपा- शिवसेनेच्या युती संदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. राज्यस्तरावर शिवसेना-भाजपामध्ये वाढलेली मतभेदाची दरी ही भाजपा उमेदवारासाठी चिंतेचा विषय असणार आहे. शिवाय राष्ट्रवादीचे उमेदवार आ.दुर्राणी यांना तगडा स्पर्धक म्हणून भाजपाकडून कोण राहणार, हे ही निश्चित होत नाही. सद्यस्थितीत परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यातून भाजपाकडून पाच ते सहा जणांची नावे चर्चेत आहेत. विशेषत: इतर पक्षातून भाजपात काही महिन्यांपूर्वी प्रवेश केलेल्यांकडून उमेदवारी मागितली जात असल्याची चर्चा आहे. असे असेल तर मग अनेक वर्षापासून निष्ठेने भाजपाचे काम करणाºया कार्यकर्त्यांवर अन्याय होणार नाही का? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
परभणी- हिंगोली आणि लातूर- उस्मानाबाद- बीड या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये अनुक्रमे राष्ट्रवादी व काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत.त्या दृष्टीकोनातून रविवारी परभणीतील राष्ट्रवादीच्या आमदारांशी नांदेडमध्ये चर्चा केली आहे. समोपचाराने या संदर्भात योग्य तो घेतला जाईल.
- खा.अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस