परभणी : सार्वजनिक ग्रंथालयांची निर्मिती काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 12:22 AM2019-06-13T00:22:07+5:302019-06-13T00:22:13+5:30
स्पर्धेच्या युगात वाचन संस्कृती लोप पावत असताना वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे़ प्रत्येक गावात सार्वजनिक ग्रंथालयांची आवश्यकता असून, ती काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कवी प्रा़ इंद्रजीत भालेराव यांनी केले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : स्पर्धेच्या युगात वाचन संस्कृती लोप पावत असताना वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे़ प्रत्येक गावात सार्वजनिक ग्रंथालयांची आवश्यकता असून, ती काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कवी प्रा़ इंद्रजीत भालेराव यांनी केले़
उच्च व तंत्र शिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय यांच्या वतीने घेण्यात येत असलेल्या ग्रंथपालन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या निरोप समारंभ प्रसंगी भालेराव बोलत होते़
७ जून रोजी येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या गं्रथालयात पार पडलेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ़ रामेश्वर पवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे, जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव विलास शिंदे, नेमीचंद घोडके, केशव तुपे, डॉ़ रामदास टेकाळे, प्राचार्य विठ्ठल घुले, प्रा़रावसाहेब क्षीरसागर यांची उपस्थिती होती़
भालेराव म्हणाले, वाचनामुळे मानवाचा बौद्धिक विकास होतो, सध्या स्पर्धेच्या युगामध्ये वाचन महत्त्वाचे असून, यासाठी सार्वजनिक ग्रंथालये हा महत्त्वाचा घटक आहे़
आधुनिक जगात स्मार्ट मोबाईल आला असला तरी त्या माध्यमातून चांगले घेणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले़ यावेळी भालेराव यांनी ‘काट्या कुट्याचा तुडवित रस्ता, गावकडे चल माझ्या दोस्ता’ ही कविता सादर केली़
डॉ़ रामेश्वर पवार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर ग्रंथालयाकडे वळा, सतत वाचन करा, वाचनामुळेच तुम्ही जगू शकाल, असे ते म्हणाले़ जिल्हा ग्रंथालय अधिकारी बालाजी कातकडे, प्राचार्य विठ्ठल घुले, विद्यार्थी प्रतिनिधी वैभव राऊत यांनीही मनोगत व्यक्त केले़ राजेश्वरी घाडगे यांनी सूत्रसंचालन केले़ डॉ़ त्रिमूर्ती सोमवंशी यांनी आभार मानले़