परभणी : नवीन तलाठी सज्जे लाल फितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 12:01 AM2019-07-25T00:01:16+5:302019-07-25T00:02:08+5:30
महसूल प्रशासनाचे काम सोयीचे व्हावे आणि ग्रामस्थांना तात्काळ सेवा मिळण्यासाठी सुविधा निर्माण व्हावी, या उद्देशाने वर्षभरापूर्वी जिल्ह्यातील तलाठी सज्जे आणि मंडळ कार्यालयाची पूनर्रचना करुन जिल्ह्यात ७६ सज्जे आणि १३ मंडळ कार्यालये वाढविण्यात आले खरे; परंतु, या शासकीय कार्यालयांमध्ये कामकाज करण्यासाठी पदनिर्मिती होत नसल्याने महसूलच्या कामकाजातील अडथळे कायम असून ग्रामस्थांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महसूल प्रशासनाचे काम सोयीचे व्हावे आणि ग्रामस्थांना तात्काळ सेवा मिळण्यासाठी सुविधा निर्माण व्हावी, या उद्देशाने वर्षभरापूर्वी जिल्ह्यातील तलाठी सज्जे आणि मंडळ कार्यालयाची पूनर्रचना करुन जिल्ह्यात ७६ सज्जे आणि १३ मंडळ कार्यालये वाढविण्यात आले खरे; परंतु, या शासकीय कार्यालयांमध्ये कामकाज करण्यासाठी पदनिर्मिती होत नसल्याने महसूलच्या कामकाजातील अडथळे कायम असून ग्रामस्थांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
२०१८ पूर्वी परभणी जिल्ह्यामध्ये २३९ तलाठी सज्जे आणि ३९ मंडळ कार्यालय अस्तित्वात होती. महसूल प्रशासनातील तलाठी, मंडळ अधिकारी हे कर्मचारी प्रशासन आणि ग्रामस्थांमधील दुवा म्हणून काम करतात. गावपातळीवरील अनेक महत्वाची कामे या दोन पदांच्या माध्यमातून केली जातात. सद्यस्थितीला जिल्ह्यातील एका तलाठी सज्जाअंतर्गत ५ ते ६ गावांचा कारभार चालविला जातो. एका गावात साधारणत: १ हजार कुटुंब संख्या असेल तर ५ ते ६ हजार कुटुंबांचे जमिनीचे, शेती संदर्भातील व्यवहाराचा भार एकाच तलाठ्यावर येऊ न पडतो. परिणामी कामकाजात शिथीलता येऊन त्याचा फटका ग्रामस्थांना सहन करावा लागतो. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये पीक विमा काढण्याचे काम सुरु आहे. पीक विम्यासाठी तलाठ्यांकडून सात-बारा उतारा घ्यावी लागत असे. एका सज्जामध्ये अनेक गावांचा समावेश असल्याने शेतकऱ्यांना सातबारासाठी धावपळ करावी लागत आहे. एक-एक दिवस तलाठी कार्यालयात काढावा लागत आहे. एक वर्षापूर्वी जिल्ह्यातील तलाठी सज्जे आणि मंडळ कार्यालयांची पूनर्रचना झाली. त्यात जिल्ह्यात ७६ सज्जे आणि १३ मंडळ कार्यालयांची भर पडली. १० जानेवारी २०१८ रोजी वाढीव तलाठी सज्जे आणि मंडळांची राजपत्रात नोंद घेण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यात आता ३१५ तलाठी सज्जे आणि ५२ महसूल मंडळे निर्माण झाली आहेत. या नवीन तलाठी सज्जांची निर्मिती झाली असली तरी प्रत्यक्षात तलाठी सज्जांसाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध झाले नाही. जिल्हा प्रशासनाने सहा महिन्यांपूर्वी कोणत्या तालुक्यात किती तलाठी पद भरावे लागतात, या संदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे; परंतु, पदनिर्मितीची प्रक्रिया झाली नसल्याने तलाठी सज्जे, मंडळ कार्यालये लालफितीत अडकले आहेत.
पुनर्रचना : वाढलेली मंडळ कार्यालय, तलाठी सज्जे
४परभणी जिल्ह्यात मंडळ कार्यालय आणि तलाठी सज्जाची पुनर्रचना झाली. त्यात परभणी तालुक्यात ४७ तलाठी सज्जे होते. ही संख्या आता ५५ एवढी झाली आहे. तर ८ मंडळ कार्यालयांमध्ये टाकळी कुंभकर्ण या नवीन मंडळ कार्यालयाची भर पडली आहे. गंगाखेड तालुक्यामध्ये पूर्वी ४ मंडळे होती. आता मंडळांची संख्या ५ झाली असून पिंपळदरी या नवीन मंडळ कार्यालयाची भर पडली आहे. तसेच तलाठी सज्जांची संख्या २३ वरुन ३२ एवढी झाली आहे. पूर्णा तालुक्यात ५ मंडळ कार्यालयांऐवजी ६ मंडळ कार्यालयाची रचना करण्यात आली आहे. कावलगाव या नवीन मंडळाची तालुक्यात भर पडली आहे. तर २८ तलाठी सज्जाऐवजी आता ३६ तलाठी सज्जे या तालुक्यात स्थापन झाली आहेत.
४ पालम तालुक्यामध्ये पेठशिवणी, रावराजूर या दोन नवीन मंडळाची निर्मिती करण्यात आली असून १९ तलाठी सज्जांमध्ये ८ नवीन सज्जांची भर पडली आहे. पाथरी तालुक्यात कासापुरी हे नवीन मंडळ कार्यालय तयार केल्याने मंडळांची संख्या ४ झाली असून तलाठी सज्जाची संख्या १८ वरुन २६ वर पोहोचली आहे. मानवत तालुक्यात पूर्वी ३ मंडळे होती. त्यात ताडबोरगाव आणि रामपुरी या दोन मंडळांची भर पडली आहे. २१ तलाठी सज्जाऐवजी आता २९ तलाठी सज्जे निर्माण करण्यात आली आहेत. सोनपेठ तालुक्यात पूर्वी दोनच मंडळे होती. नव्या पुनर्रचनेत शेळगाव आणि वडगाव या दोन मंडळांची निर्मिती झाली असून तलाठी सज्जे १५ हून २३ झाले आहेत.
४सेलू तालुक्यात पाच मंडळे होती. या तालुक्यात मोरेगाव या नवीन मंडळाची निर्मिती झाली आहे. तसेच तलाठी सज्जांची संख्या २९ वरुन ३७ एवढी झाली आहे.
४जिंतूर तालुक्यात दुधगाव आणि वाघी धानोरा या दोन नवीन मंडळाची निर्मिती झाली असून ३८ तलाठी सज्जाऐवजी आता ४८ तलाठी सज्जाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मंडळ कार्यालयांची संख्या ३९ वरुन ५२ एवढी झाली असून २३९ तलाठी सज्जांची संख्या ३१५ एवढी झाली आहे.
कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांचा प्रश्न
४जुन्या पदसंख्येनुसार परभणी जिल्ह्यात तलाठ्यांची २३९ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३२ पदे रिक्त असून अनेक तलाठ्यांना इतर तलाठी सज्जांचा पदभार देऊन कारभार चालवला जात आहे. मंडळ अधिकाºयांचीही ३९ पैकी ३ पदे रिक्त आहेत.
४त्यामुळे नवीन पदनिर्मिती तर सोडाच. उपलब्ध पदेही परिपूर्णपणे कार्यरत नसल्याने महसूल विभागाला कामकाज करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नवीन पदनिर्मितीबरोबरच जुनी पदे भरण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज निर्माण झाली आहे.