परभणी : पुराच्या पाण्यात काढली रात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 11:59 PM2019-10-25T23:59:23+5:302019-10-25T23:59:30+5:30
गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे वाघाळा येथील नदीला पूर आल्याने एक आदिवासी कुटुंब पुराच्या पाण्यात रात्रभर अडकले. शुक्रवारी सकाळी या कुटुंबाने पाणी ओसरल्यानंतर गाव गाठले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी): गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे वाघाळा येथील नदीला पूर आल्याने एक आदिवासी कुटुंब पुराच्या पाण्यात रात्रभर अडकले. शुक्रवारी सकाळी या कुटुंबाने पाणी ओसरल्यानंतर गाव गाठले.
गुरुवारच्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर येऊन शेत-शिवारात पाणी शिरले. तालुक्यातील वाघाळा शिवारात चिल्लारीच्या काटेरी झुडपांपासून कोळसा निर्मिती करणारे आदिवासी कुुटुंब पुरात आडकले. विशेष म्हणजे या कुटुंबाने पुराच्या पाण्यात रात्र काढून आपला जीव वाचविला. नदीपुलावरुन पाणी वाहत असल्याने शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत वाघाळा, मुद्गल, फुलारवाडी आदी गावांचा शहराशी संपर्क तुटला होता.
वडी शिवारात नदीला पूर आल्याने निवळी, पाटोदा, गोपेगाव येथील वाहतूक बंद होती. तालुक्यात गुरुवारी मुसळधार पाऊस झाल्याने नदी-नाल्यांना पूर आला असून गोदावरी नदीवरील ढालेगाव बंधाऱ्यात पाण्याची आवक वाढल्याने ११ दरवाजांमधून पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. गुरुवारी दिवसभर तालुक्यात पावसाची रिपरिप सुरु होती. रात्री १० वाजेपर्यंत तालुक्यामध्ये ८३.३३ मि.मी. पाऊस झाला.
या तालुक्याने वार्षिक सरासरी यापूर्वीच ओलांडली आहे. आता होत असलेल्या पावसामुळे सोयाबीन व कापूस पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे.