परभणी : शासनाच्या निषेधासाठी निर्भय मॉर्निंग वॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 01:01 AM2018-08-21T01:01:30+5:302018-08-21T01:02:13+5:30
नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास लावण्यात यंत्रणांना अपयश आल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सोमवारी शहरातून निर्भय मॉर्निंग वॉक काढून निषेध नोंदविण्यात आला़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास लावण्यात यंत्रणांना अपयश आल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सोमवारी शहरातून निर्भय मॉर्निंग वॉक काढून निषेध नोंदविण्यात आला़
२० आॅगस्ट रोजी डॉ़ नरेंंद्र दाभोलकर यांच्या हत्येला ५ वर्षे पूर्ण होत आहेत़ तर ज्येष्ठ कामगार नेते कॉ़ गोविंद पानसरे, माजी कुलगुरु प्रा़ डॉ़ एम़एम़ कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या़ त्या सर्व घटना षडयंत्र असून, नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आल्या़ मात्र या प्रकरणांमध्ये तपासी यंत्रणांना अजूनही आरोपींचा शोध लागला नाही़ त्यामुळे तपासी यंत्रणा व शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मॉर्निंग वॉक काढण्यात आला़
सकाळी ६ वाजेच्या सुमारास येथील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मॉर्निंग वॉकला सुरुवात झाली़ या अनोख्या आंदोलना दरम्यान, आंदोलकांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजीही केली़
राजगोपालाचारी उद्यानात या निर्भय मॉर्निंग वॉकचा समारोप झाला़ यावेळी अंनिसचे जिल्हाध्यक्ष डॉ़ रविंद्र मानवतकर, सचिव प्राचार्य डॉ़ विठ्ठल घुले यांनी मनोगत व्यक्त केले़ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात काही दिवसांपूर्वी तपासी यंत्रणांनी आरोपींना ताब्यात घेतले; परंतु, या हत्या प्रकरणातील षडयंत्र नेमके कोणाचे? त्यांचा शोध घेण्यात पोलिसांना अपयश आले आहे़ देशातील तपासणी यंत्रणांना ५-५ वर्षांपर्यंत आरोपींचा शोध लागत नसेल तर हे यंत्रणांचे अपयश असल्याचेही यावेळी मानवतकर, प्राचार्य घुले यांनी नमूद केले़ यावेळी कॉ किर्तीकुमार बुरांडे, प्राचार्य डॉ़ शिवाजीराव दळणर, कॉ़ राजन क्षीरसागर, डॉ़ परमेश्वर साळवे, अॅड़ लक्ष्मण काळे, नितीन सावंत यांचीही भाषणे झाली़
मुंजाजी कांबळे यांनी सूत्रसंचालन केले़ यावेळी डॉ़ सुनील जाधव, महाजन, रंगनाथ चोपडे, रहीम भाई, लक्ष्मण जोगदंड यांच्यासह नवरचना प्रतिष्ठानचे विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते़
बोरीत येथे अंनिसचे ‘जवाब दो’ आंदोलन
बोरी- डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे यांच्या हत्ये संदर्भातील तपासात दिरंगाई करणाऱ्या सरकारच्या विरोधात जिंतूर तालुक्यातील बोरी येथे अंनिसच्या वतीने सोमवारी ‘जबाब दो’ आंदोलन करण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येला साडेतीन वर्षे पूर्ण झाली आहेत. माजी कुलगुरू प्रा.डॉ.एम.एम.कुलगुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या दिवसाढवळ्या होऊनही या सरकारला अद्याप आरोपी सापडत नाहीत. त्यामुळे तपास कामात दिरंगाई करणाºया सरकारच्या विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बोरी शाखेच्या वतीने २० आॅगस्ट रोजी बसस्थानक ते पोलीस ठाण्यापर्यंत ‘जबाब दो’ आंदोलन करण्यात आले. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकटेश आलेवार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. या आंदोलनात डॉ. सुरेश खापरे, शिवलिंग भिसे, गजानन चौधरी, श्यामराव जाधव, नेमिनाथ जैन, रामप्रसाद शिंपले, विलास देशमुख, अभिजित चौधरी, गंगाधर कदम आदींचा सहभाग होता.