परभणी : ५०० ऐवजी निघाली १० रुपयांची नोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 12:31 AM2018-05-17T00:31:03+5:302018-05-17T00:31:03+5:30
एटीएम मशीनमधून १० हजार रुपये काढण्यासाठी मशीनवर संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर मिळालेल्या नोटांमध्ये ५०० रुपयांऐवजी चक्क १० रुपयांची एक नोट मशीनमधून बाहेर पडली़ त्यामुळे १० हजारांऐवजी केवळ ९ हजार ५१० रुपयेच ग्राहकाच्या हाती पडल्याचा प्रकार गंगाखेड शहरात १६ मे रोजी घडला आहे़
अन्वर लिंबेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : एटीएम मशीनमधून १० हजार रुपये काढण्यासाठी मशीनवर संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर मिळालेल्या नोटांमध्ये ५०० रुपयांऐवजी चक्क १० रुपयांची एक नोट मशीनमधून बाहेर पडली़ त्यामुळे १० हजारांऐवजी केवळ ९ हजार ५१० रुपयेच ग्राहकाच्या हाती पडल्याचा प्रकार गंगाखेड शहरात १६ मे रोजी घडला आहे़
केंद्र शासनाने डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत़ रोकड रहित व्यवहारावर भर देताना आॅनलाईन व्यवहारादरम्यान, पैसे संबंधितांना न पोहोचण्याचे अनेक प्रकार यापूर्वी घडले आहेत़
खाते क्रमांक अथवा बँकेचा आयएफसी कोड बदलल्याने तिसऱ्याच्याच खात्यावर पैसे गेल्याचे प्रकार यापूर्वी ऐकिवात होते़ आता मात्र एटीएम मशीनही मागितलेल्या रकमेऐवजी कमी रक्कम देत असल्याचा प्रकार गंगाखेडमध्ये घडला आहे़ गंगाखेड तालुक्यातील गोदावरी तांडा येथील गोविंद तुकाराम राठोड हे १६ मे रोजी गंगाखेड शहरातील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएम केंद्रामध्ये पैसे काढण्यासाठी गेले़ त्यांना १० हजार रुपये खात्यातून काढायचे होते़ त्यामुळे त्यांनी एटीएम मशीनमध्ये कार्ड स्वॅप करून १० हजार रुपयांचे विड्रॉल टाकण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केली़ त्यानंतर गोविंद राठोड यांना मशीनमधून २० नोटा मिळाल्या़ त्यात ५०० रुपयांच्या १९ आणि १० रुपयांच्या एका नोटेचा समावेश होता़ विशेष म्हणजे एटीएम मशीनमधून केवळ १०० रुपयांच्या वरील नोटाच मिळतात; परंतु, ५०० रुपयांच्या नोटेत १० रुपयांची एक नोट मिळाल्याने राठोड यांच्या हातात १० हजारांऐवजी ९ हजार ५१० रुपये पडले़ हा प्रकार घडल्यानंतर गोविंद राठोड यांनी भारतीय स्टेट बँकेच्या व्यवस्थापकांकडे लेखी तक्रार केली आहे़