परभणी : आता टीईटी अनुत्तीर्ण शिक्षकांची सुनावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:41 AM2020-01-04T00:41:49+5:302020-01-04T00:42:32+5:30
टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या खाजगी शाळांमधील शिक्षकांच्या सेवा समाप्त करा; परंतु, परस्पर कोणतेही आदेश काढू नका, असे आदेश औरंगाबाद विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी काढले असून आता अशा शिक्षकांची सुनावणी घेण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या खाजगी शाळांमधीलशिक्षकांच्या सेवा समाप्त करा; परंतु, परस्पर कोणतेही आदेश काढू नका, असे आदेश औरंगाबाद विभागाच्या शिक्षण उपसंचालकांनी काढले असून आता अशा शिक्षकांची सुनावणी घेण्यात येणार आहे.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम कायद्यानुसार शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता व सेवा शर्ती ठरविण्याकरीता राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेला शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे. त्यानुसार या परिषदेने शैक्षणिक व व्यवसायिक पात्रता (टीईटी) परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी काढले होते. त्या अनुषंगाने परभणी येथील शिक्षण विभागाच्या वतीने ३० डिसेंबर रोजी खाजगी शिक्षण संस्थाचे अध्यक्ष व सचिवांच्या नावे आदेश काढण्यात आला होता. त्यामध्ये टीईटी नसलेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता शिक्षण उपसंचालक कार्यालयाने नवीन आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना पाठविले आहेत. त्या अनुषंगाने माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.वंदना वाहुळ यांनी ३ जानेवारी रोजी सर्व शासकीय माध्यमिक शाळांचे अध्यक्ष व सचिवांच्या नावे आदेश काढला आहे. त्यात शिक्षण संचालकांनी ३१ डिसेंबर रोजी काढलेल्या पत्राचा संदर्भ देण्यात आला असून सदरील परिपत्रकाच्या निर्देशानुसार विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सुनावणी घेऊन शिक्षकांच्या शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेबाबत शाहनिशा करुन सेवा समाप्तीचे बोलके आदेश पारित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या आदेशानुसार संबंधित संस्थेने शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता नसलेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्तीबाबत कारवाई करावी. परस्पर कोणतेही आदेश काढू नयेत, अशा सूचना दिल्या आहेत. दिलेल्या आदेशानुसारच कारवाई करावी, असेही ३ जानेवारीच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
सुनावणीनंतर होणार अंतिम निर्णय ?
४टीईटी अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकांच्या सेवा समाप्त करण्याचे आदेश देण्यात आले असले तरी या शिक्षकांची शिक्षण उपसंचालक सुनावणी घेणार आहेत.
४या सुनावणीनंतर अंतिम निर्णय होणार आहे. त्यामुळे या शिक्षकांना अप्रत्यक्षरित्या आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाबाबत संभ्रावस्था कायम
४शिक्षण उपसंचालकांनी काढलेल्या आदेशात एकीकडे सेवा समाप्तीचे बोलके आदेश पारित करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्या तरी पुन्हा एकदा या शिक्षकांची सुनावणी घेणार असल्याचे सांगून या संदर्भात संभ्रम निर्माण केला आहे.
४ एकदा सेवा समाप्तीचा आदेश काढल्यानंतर पुन्हा कशी काय सुनावणी होऊ शकते? असा सवाल उपस्थित होत आहे. सेवा समाप्तीचा आदेश काढण्यापूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण का केली नाही? सातत्याने निर्णयांमध्ये बदल करुन संभ्रमावस्था का निर्माण केली जात आहे, असाही सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.