परभणी : हजारोंच्या उपस्थितीत नृसिंह जन्मोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 11:53 PM2019-05-17T23:53:12+5:302019-05-17T23:54:14+5:30
तालुक्यातील श्रीक्षेत्र पोखर्णी नृसिंह येथे शुक्रवारी सायंकाळी ६.५१ वाजता ह.भ.प.अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या देवजन्माच्या कीर्तनात नृसिंह जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यभरातून आलेल्या ३५ ते ४० हजार भाविकांनी या सोहळ्यात सहभाग नोंदविला. याचवेळी ६१ रंगीत तोफांची केलेली आतषबाजी आकर्षण ठरली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तालुक्यातील श्रीक्षेत्र पोखर्णी नृसिंह येथे शुक्रवारी सायंकाळी ६.५१ वाजता ह.भ.प.अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या देवजन्माच्या कीर्तनात नृसिंह जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. राज्यभरातून आलेल्या ३५ ते ४० हजार भाविकांनी या सोहळ्यात सहभाग नोंदविला. याचवेळी ६१ रंगीत तोफांची केलेली आतषबाजी आकर्षण ठरली.
गुरुवारी दुपारपासूनच राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक नृसिंह मंदिरात दाखल होत होते. शुक्रवारी भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली. सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. सकाळी १० ते १ या वेळेत ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांची नृसिंह पुराण कथा संपन्न झाली. सायंकाळी ५ वाजता नृसिंह जन्मोत्सव सोहळ्याच्या कीर्तनास प्रारंभ झाला. ह.भ.प.अच्युत महाराज दस्तापूरकर यांचे देवजन्माचे कीर्तन सुरु झाले. यावेळी ६.५१ वाजता नृसिंह जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
या सोहळ्यानिमित्त मंदिर परिसराला यात्रेचे स्वरुप आले होते. परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले असून मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. जन्मोत्सव सोहळ्यानंतर श्रींची पालखी मिरवणूक मंदिर प्रदक्षिणेसाठी काढण्यात आली. यावेळी राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागील सात दिवसांपासून भाविकांची होत असलेली गर्दी पाहून पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला होता. पोखर्णी व परिसरातील ग्रामस्थांनी सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. १८ मे रोजी सकाळी १० वाजता कथा व दुपारी २ वाजता महाप्रसाद होणार आहे. रात्री ९ वाजता श्रींची पालखी मिरवणूक ग्राम प्रदक्षिणेसाठी निघणार आहे.
‘नरहरी शामराज की जय’चा जयघोष
४नृसिंह पुराण कथेमध्ये हिरण्यकश्यपूने आपला मुलगा प्रल्हाद याला विचारले, तुझा नारायण आहे कुठे? त्यावेळी भक्त प्रल्हाद म्हणाला, तो जळी, स्थळी, सगळीकडे आहे, त्याचवेळी हिरण्यकश्यपूने जवळच्याच खांबावर लाथ मारली. त्या खांबातून नृसिंह प्रगटले आणि त्यांनी हिरण्यकश्यपूचा वध करीत भक्त प्रल्हादाचे रक्षण केले.
४‘खांबावरी लाथ मारिली दुर्जने, स्तंभि नारायण प्रगटले’, हा अंभग ह.भ.प. अच्युत महाराजांनी सादर केल्यानंतर सायंकाळी ६.५१ वाजता ‘नरहरी शामराज की जय’चा जयघोष करीत टाळ-मृदंगाच्या गजरात गुलालाची उधळण करण्यात आली. आकर्षक आतषबाजी करण्यात आली.
ग्रामस्थांसाठी दिवाळीचा सण
४श्रीक्षेत्र नृसिंह पोखर्णी येथील सोहळा ग्रामस्थांसाठी दिवाळी सणासारखा महत्त्वाचा मानला जातो. या सोहळ्यास गावातील सासरी गेलेल्या मुली माहेरी येतात व सोहळ्यात सहभागी होतात. त्यामुळे ग्रामस्थांना दिवाळीचाच अनुभव येतो.
४सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी पोखर्णीसह परिसरातील अनेक गावचे ग्रामस्थ हिरीरीने प्रयत्न करतात.