परभणी : आचारसंहिता भंगाच्या गुन्ह्यांची संख्या अठरावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 12:04 AM2019-10-13T00:04:29+5:302019-10-13T00:05:59+5:30
विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याच्या प्रकरणात आतापर्यंत १८ गुन्हे दाखल झाले असून, त्यात सेलू-जिंतूर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक १० गुन्ह्यांचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : विधानसभा निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याच्या प्रकरणात आतापर्यंत १८ गुन्हे दाखल झाले असून, त्यात सेलू-जिंतूर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक १० गुन्ह्यांचा समावेश आहे.
आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने २१ सप्टेंबरपासून जिल्ह्यात आचारसंहितेचा भंग करणाऱ्याविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. दुचाकी वाहनांचा दुरुपयोग करुन आचारसंहितेचा भंग केल्याचे दोन गुन्हे दाखल झाले असून, विनापरवाना रॅली काढणे, विनापरवाना सभा घेणे, विनापरवाना प्रचार केल्याप्रकरणी ६ गुन्हे दाखल झाले आहेत आणि दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध ७ गुन्हे दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील चारही मतदार संघाच्या तुलनेत इतर जिंतूर मतदार संघात सर्वाधिक १० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.जिल्ह्यात अवैध दारू विक्रीच्या विरोधातही निवडणूक विभागाच्या पथकांनी कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत या पथकांनी ३ लाख २१ हजार ७७६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यात १५ हजार १८४ रुपयांची देशी दारू, १ लाख ४० हजार रुपयांची बुलेट मोटारसायकल, २० हजारांची दुचाकी, जिंतूर येथेच देशी दारू व दोन दुचाकी असा १ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल निवडणूक विभागाच्या स्थायी पथकाने जप्त केला आहे. आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध पथकांची स्थापना केली आहे. यामध्ये एसएसटी पथकामार्फत वाहनांची तपासणी केली जाते. परभणीसह जिंतूर, सेलू, पाथरी, गंगाखेड या शहरांमध्ये मुख्य रस्त्यावर चेकपोस्ट उभारुन तपासणी केली जात आहे.