परभणीत जुनी पाणी पुरवठा योजना ठरली पर्यायी, मनपाची झाली ४० लाखांची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 08:20 PM2020-08-11T20:20:32+5:302020-08-11T20:20:51+5:30

परभणी शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन युआयडीएसएसएमटी आणि अमृत योजनेतून नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली.

In Parbhani, the old water supply scheme became an alternative, the corporation saved 40 lakhs | परभणीत जुनी पाणी पुरवठा योजना ठरली पर्यायी, मनपाची झाली ४० लाखांची बचत

परभणीत जुनी पाणी पुरवठा योजना ठरली पर्यायी, मनपाची झाली ४० लाखांची बचत

Next
ठळक मुद्देपाण्याचा अपव्यय थांबणार

परभणी :  शहराला पाणीपुरवठा करणारी राहटी येथील जुनी योजना पर्यायी स्वरुपात वापरण्याचा निर्णय घेतल्याने महानगरपालिका प्रशासनाची महिन्याकाठी तब्बल ४० लाख रुपयांची बचत होणार आहे. येत्या आठवडाभरात शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा येलदरी येथील योजनेवरुन सुरु केला जाणार आहे. 

परभणी शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन युआयडीएसएसएमटी आणि अमृत योजनेतून नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. या योजनेचे काम पूर्ण झाले असून शहरात सध्या नव्या योजनेवर नळ जोडणी दिली जात आहे. ही योजना कार्यान्वित करीत असतानाच मनपा प्रशासनाने जुनी योजना सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शहरातील वसमत रोड भागातील ममता कॉलनीतील पाण्याची टाकी, एमआयडीसी भागातील पाण्याची टाकी आणि राजगोपालाचारी उद्यानात नव्याने उभारण्यात येत असलेली पाण्याची टाकी या तिन्ही पाण्याच्या टाक्या जुन्या योजनेवरच ठेवल्या होत्या. त्यामुळे वसमत रोड भागातील बहुतांश वसाहतींना राहटी येथील जुन्या योजनेतून पाणीपुरवठा केला जात होता.

यासाठी ही संपूर्ण यंत्रणा सुरु ठेवण्यासाठी महानगरपालिकेला प्रत्येक महिन्याला लाखो रुपयांचा खर्च करावा लागत असे. राहटी येथील पंप हाऊस आणि वसमत रस्त्यावरील जलशुद्धीकरण केंद्राचे वीज बिल साधारणत: २० ते २२ लाख रुपये येत होते. तसेच राहटी येथील पंप २४ तास सुरु ठेवावे लागत असल्याने या पंपांच्या देखभाल दुरुस्तीसाठी वर्षाला २० लाख रुपयांचा खर्च होतो. तसेच जलशुद्धीकरण केंद्रात पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी ब्लिचिंग पावडर व रसायनावर साधारणत: वर्षाला २५ लाख रुपयांचा खर्च करावा लागत असे. याशिवाय पंपहाऊस येथील ८ आॅपरेटर आणि जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचारी असे १६ कर्मचारी या योजनेवर काम करीत होते. 
महानगरपालिका प्रशासनाने ही सर्व यंत्रणा पर्यायी स्वरुपात वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत तिन्ही जलकुंभ येलदरी येथील नवीन पाणीपुरवठा योजनेला जोडले आहेत.

दोन दिवसांपूर्वी हे काम पूर्ण झाले. त्यामुळे येत्या आठवडाभरात संपूर्ण शहराला येलदरी येथील योजनेवरुन पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे राहटी येथील योजनेवरील वीज बिल १० ते १५ लाखांनी कमी होणार आहे. शिवाय ब्लिचिंग पावडरवर होणारा महिन्याकाठीचा १० लाख रुपयांचा खर्च वाचणार आहे. तसेच राहटी बंधाºयात येलदरी येथून नदीपात्रातून पाणी विकत घेतले जात होते. हा सर्व सुमारे महिन्याकाठी ४० लाख रुपयांचा खर्च वाचणार आहे. त्याच प्रमाणे राहटी बंधाऱ्यावरील १६ कर्मचाºयांपैकी १० कर्मचारी नवीन योजनेच्या कामासाठी उपयोगात येणार आहेत.

शहरवासीयांना सुरळीत पाणीपुरवठा
राहटी येथील पाणीपुरवठा योजना ३० वर्षापूर्वीची जुनी आहे. या योजनेवरील जलवाहिनी जागोजागी खराब झाली असून नळांना पाणी सोडल्यानंतर मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. तसेच शहरवासियांना ८ ते १० दिवसांतून एक वेळा पाणीपुरवठा होत आहे. ही योजना पर्यायी स्वरुपात वापरण्याचा निर्णय झाल्याने आता येलदरी येथील पाणी थेट जलवाहिनीने शहरात पोहोचले असल्याने पाणी वितरण करणे सोयीचे होणार आहे. परिणामी शहरवासीयांना नियमित आणि मुबलक पाणी उपलब्ध होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. 

वीज पुरवठ्याचा अडथळाही दूर
राहटी येथील योजना चालविण्यासाठी महानगरपालिकेने या भागात महावितरण कंपनीकडून एक्सप्रेस फिडर बसविलेले आहे. मात्र मागच्या काही वर्षांपासून या एक्सप्रेस फिडरवरील वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत होता. परिणामी, मनपाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत होते. आता ही योजना पर्यायी स्वरुपात वापरली जाणार असल्याने विजेचा अडथळाही दूर होणार आहे. 

Web Title: In Parbhani, the old water supply scheme became an alternative, the corporation saved 40 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.