परभणी : वाळू चोरी प्रकरणी एकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 12:54 AM2019-09-16T00:54:46+5:302019-09-16T00:55:33+5:30
तालुक्यातील उमरा येथील गोदावरी नदीच्या पात्रातून ८०० ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील डिग्रस (ता़ परळी) येथील सरपंचास पाथरी पोलिसांनी १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी अटक केली आहे़ या प्रकरणात १७ लाख रुपयांच्या वाळू चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी): तालुक्यातील उमरा येथील गोदावरी नदीच्या पात्रातून ८०० ब्रास वाळू चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील डिग्रस (ता़ परळी) येथील सरपंचास पाथरी पोलिसांनी १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी अटक केली आहे़ या प्रकरणात १७ लाख रुपयांच्या वाळू चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे़
पाथरी तालुक्यातील उमरा शिवारात गट नंबर २९१ मधील वाळू घाटावरून अंदाजे ८०० ब्रास वाळू उत्खनन आणि वाहतूक केल्या प्रकरणी नायब तहसीलदार संदीप साखरे यांच्या फिर्यादीवरून १० सप्टेंबर रोजी बीड जिल्ह्यातील डिग्रस (ता़ परळी) येथील सरपंच सुभाष नाटकर यांच्या विरोधात पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ डिग्रस येथील सरपंचांनी २० जून ते १४ जुलै २०१९ या कालावधीत उमरा येथील दोन वाळू घाटातून ८०० ब्रास वाळू (बाजार मूल्य १७ लाख २४ हजार) उत्खनन आणि वाहतूक केल्याचा अहवाल तलाठी ए़व्ही़ निरडे आणि मंडळ अधिकारी गोवंदे यांनी पाथरी येथील तहसीलदारांना सादर केला होता़ त्यानंतर १० सप्टेंबर रोजी डिग्रस येथील सरपंच सुभाष नाटकर यांच्या विरोधात नायब तहसीलदारांच्या फिर्यादीवरून पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़
१३ सप्टेंबर रोजी पाथरी पोलिसांनी परळी तालुक्यातील डिग्रस येथील सरपंच सुभाष नाटकर यांना गावात जाऊन अटक केली़ त्यानंतर १४ सप्टेंबर रोजी पाथरी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे़, अशी माहिती पोलीस निरीक्षक डी़डी़ शिंदे यांनी दिली़
या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अहिरे यांच्याकडे देण्यात आला आहे़
पाथरी तालुक्यात वाळू घाटांचे लिलाव झाले नसतानाही मोठ्या प्रमाणात वाळुचा उपसा होत आहे़ महसूल प्रशासनाने याकडे लक्ष देऊन वाळूचा अवैध उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़