परभणी : आरोग्य संस्थेत आॅनलाईन जन्म प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 11:45 PM2020-02-28T23:45:14+5:302020-02-28T23:45:35+5:30
प्रसूतीनंतर लगेच बाळाला आॅनलाईन जन्म प्रमाणपत्र देण्याची सुविधा जिल्ह्यात सुरू झाली असून, या अंतर्गत शुक्रवारी सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातील पहिले जन्म प्रमाणपत्र पालकांना देण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : प्रसूतीनंतर लगेच बाळाला आॅनलाईन जन्म प्रमाणपत्र देण्याची सुविधा जिल्ह्यात सुरू झाली असून, या अंतर्गत शुक्रवारी सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात जिल्ह्यातील पहिले जन्म प्रमाणपत्र पालकांना देण्यात आले आहे.
आरोग्य संस्थांमध्ये जन्म झालेल्या बाळांना जन्म प्रमाणपत्र देणे तसेच आरोग्य संस्थेत उपचार घेत असताना मृत्यू पावल्यानंतर त्याच ठिकाणी मृत्यू प्रमाणपत्र देण्याची योजना अंमलात आणली जात आहे. त्याअंतर्गत परभणी जिल्ह्यात सेलू येथील उपजिल्हा रुग्णालय, सोनपेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालय तसेच दैठणा येथे सध्या ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या बाळाला पहिले आॅनलाईन जन्म प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. टप्प्याटप्प्याने ही सुविधा जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये सुरू केली जाणार असल्याची माहिती जिल्हा निबंधक (जन्म-मृत्यू) तथा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस.पी. देशमुख यांनी दिली. यापुढे आरोग्य संस्थेमध्ये जन्मलेल्या प्रत्येक बाळाचे जन्म प्रमाणपत्र, त्याचप्रमाणे आरोग्य संस्थेत उपचार घेताना मृत्यू झाल्यास मृत्यूचे प्रमाणपत्र आरोग्य संस्थेतून वितरित केले जाणार आहे. याकामी शासनामार्फत स्वतंत्र सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. याबाबत तालुकास्तरावर सांख्यिकी अधिकारी राजेंद्र दुसाने यांच्यामार्फत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे.