परभणी : ईव्हीएम मशीनची आॅनलाईन नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:30 AM2018-08-25T00:30:18+5:302018-08-25T00:33:26+5:30
जिल्ह्याला प्राप्त झालेल्या मतदान यंत्रांची ईटीएस प्रणालीच्या सहाय्याने आॅनलाईन नोंद घेण्याचे काम सुरु झाले आहे. येथील कल्याण मंडप परिसरातील स्ट्राँगरुममध्ये पक्ष प्रतिनिधींच्या साक्षीने हे काम केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: जिल्ह्याला प्राप्त झालेल्या मतदान यंत्रांची ईटीएस प्रणालीच्या सहाय्याने आॅनलाईन नोंद घेण्याचे काम सुरु झाले आहे. येथील कल्याण मंडप परिसरातील स्ट्राँगरुममध्ये पक्ष प्रतिनिधींच्या साक्षीने हे काम केले जात आहे.
परभणी जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांमार्फत ही कामे केली जात आहेत. महिनाभरापूर्वीच भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील मतदान केंद्रांची सद्यस्थिती तपासण्यात आली. तसेच या केंद्रांवरील सुविधा व एकूण मतदान केंद्रांची माहिती भारत निवडणूक आयोगाला कळविण्यात आली आहे. त्यानंतर काही दिवसांतच परभणी जिल्ह्याला २९८६ मतदान यंत्र प्राप्त झाले असून हे यंत्र सध्या कल्याण मंडपम् येथील स्ट्राँगरुममध्ये पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आले आहेत.
दरम्यान, प्राप्त झालेल्या मतदान यंत्राची ईटीएस प्रणालीच्या सहाय्याने नोंदणी करण्याचे काम गुरुवारपासून सुरु झाले आहे. यासाठी जिल्ह्यातील प्रमुख पक्षांच्या जिल्हाध्यक्षांना पत्र देऊन नोंदणी करताना उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या पक्ष प्रतिनिधींच्या साक्षीने प्राप्त झालेल्या मतदान यंत्रांची आॅनलाईन नोंदणी केली जाणार असून ही नोंदणी राज्य निवडणूक आयोग आणि भारत निवडणूक आयोगाकडे दाखल केली जाणार आहे.
त्यामुळे कोणत्या क्रमांकाचे मतदान यंत्र कोणत्या जिल्ह्यात आहे, याची नोंद निवडणूक आयोगाकडे राहणार आहे.
जिल्ह्यात या कामाला सुरुवात झाली असून तीन दिवसांमध्ये हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे. या नोंदणीसाठी प्रशिक्षित कर्मचाºयांची नोंदणीही करण्यात आली आहे. एकंदर जिल्ह्यात निवडणुकीच्या तयारीने वेग घेतला आहे.
नोंद घेण्यासाठी: १२ अधिकारी, कर्मचाºयांची नियुक्ती
४प्राप्त झालेल्या २९८६ मतदान यंत्रांची ईटीएस प्रणालीद्वारे नोंदणी घेण्यासाठी १२ अधिकारी आणि कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी सूचिता शिंदे यांच्या नियंत्रणाखाली हे कामकाज केले जात आहे. तसेच निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार नंदकुमार भातांब्रेकर यांचीही या कामी नियुक्ती करण्यात आली आहे. या शिवाय मानवत येथील अव्वल कारकून रवि कवडे, सोनपेठ येथील अव्वल कारकून गंगाधर विरमले, सेलू तहसील कार्यालयातील लिपीक आबासाहेब लोखंडे, परभणी तहसील कार्यालयातील लिपीक वसीम आक्रम, पालम तहसील कार्यालयातील लिपीक कुलकर्णी, गंगाखेड तहसीलमधील लिपीक किरण साखरे यांच्यासह डाटाएंट्री आॅपरेटर बाळासाहेब साळवे, पठाण वसीम अहमद खान, सय्यद शकील सय्यद रज्जाक, दिवाकर जगताप आदींची याकामी नियुक्ती केली असल्याची माहिती मिळाली.
प्रशासनाची तयारी
४निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून या तयारीचा आढावा नियमितपणे घेतला जात आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरु झाली असून राजकीय पक्षांनाही निवडणुकीचे वेध लागले आहेत. जिल्ह्यात त्या दृष्टीने वातावरण निर्मिती होत आहे.