परभणीत झाली केवळ ३५०० तूर उत्पादक शेतकर्‍यांची आधारभूत खरेदी योजनेत नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 04:18 PM2018-01-25T16:18:54+5:302018-01-25T16:19:07+5:30

आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत तूर विक्री नोंदणीसाठी जिल्ह्यातील साडे तीन हजार शेतकर्‍यांनी नाफेडकडे नोंदणी केली आहे. नवीन तूर बाजारात विक्रीसाठी आल्यानंतरही जिल्ह्यामध्ये हमीभाव खरेदी केंद्र सुरु झाले नसल्याने तूर उत्पादकांना कवडीमोल दराने आपली तूर खाजगी बाजारपेठेत विक्री करावी लागत आहे.

In Parbhani, only 3500 varieties of peasant farmers were registered under the Basic Purchase Scheme | परभणीत झाली केवळ ३५०० तूर उत्पादक शेतकर्‍यांची आधारभूत खरेदी योजनेत नोंदणी

परभणीत झाली केवळ ३५०० तूर उत्पादक शेतकर्‍यांची आधारभूत खरेदी योजनेत नोंदणी

googlenewsNext

परभणी : आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत तूर विक्री नोंदणीसाठी जिल्ह्यातील साडे तीन हजार शेतकर्‍यांनी नाफेडकडे नोंदणी केली आहे. नवीन तूर बाजारात विक्रीसाठी आल्यानंतरही जिल्ह्यामध्ये हमीभाव खरेदी केंद्र सुरु झाले नसल्याने तूर उत्पादकांना कवडीमोल दराने आपली तूर खाजगी बाजारपेठेत विक्री करावी लागत आहे.

गतवर्षी जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकर्‍यांना आपली तूर हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री करताना अडचणींचा डोंगर पार करावा लागला होता. एक-एक महिना केंद्रासमोर वाहनांच्या रांगा लावून उभे रहावे लागले. ही परिस्थिती यावर्षी उद्भवू नये म्हणून राज्य शासनाने ज्या तूर उत्पादक शेतकर्‍यांना आपली तूर हमीभाव दराने खरेदी केंद्रावर विक्री करावयाची आहे, त्या शेतकर्‍यांनी आॅनलाईन प्रणालीद्वारे आपली नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगितले. नोंदणी केल्यानंतरच त्या शेतकर्‍यांची तूर हमीभाव खरेदी केंद्राच्या माध्यमातून खरेदी केली जाणार आहे. यावर्षी खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग, उडीद या पिकांनी शेतकर्‍यांना धोका दिला आहे.

शेतकर्‍यांच्या आशा तुरीवर आहेत. खरीप हंगामाच्या शेवटी जिल्ह्यामध्ये झालेल्या समाधानकारक परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांचे तूर पीक चांगले जोमात आले होते. त्यातून चांगले उत्पादनही शेतकर्‍यांना होत आहे. शासनाने शेतकर्‍यांच्या तुरीचा प्रति क्विंटल ५ हजार ४५० रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. त्यानुसार ज्या शेतकर्‍यांना आपली तूर नाफेडच्या हमीभाव केंद्रावर विक्री करावयाची  आहे, त्या शेतकर्‍यांनी सर्वप्रथम आपापल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात आॅनलाईनच्या माध्यमातून नोंदणी करणे आवश्यक आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सेलू, मानवत, पाथरी, पूर्णा, जिंतूर, परभणी, गंगाखेड, पालम, सोनपेठ या नऊ तालुक्यातील जवळपास साडे तीन हजार शेतकर्‍यांनी आॅनलाईन नोंदणी केली आहे. 

आॅनलाईनचा अडथळा
राज्य शासनाच्या नाफेड अंतर्गत हमीभाव खरेदी केंद्रावर तूर विक्रीसाठी शेतकर्‍यांनी सर्व प्रथम आॅनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. या नोंदणीमध्ये शेतकर्‍यांकडे असलेला तुरीचा पेरा, आधारकार्ड, सातबारा, बँकेचे पासबुक, होर्डिग्ज प्रमाणपत्र, पीक पेरा प्रमाणपत्र आदी प्रमाणपत्रे सादर करावयाची आहेत. याची माहिती आॅनलाईन प्रणालीत नोंद करावयाची आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून सतत सर्व्हर डाऊन होत असल्याने तूर उत्पादकांसह अधिकारी, कर्मचार्‍यांना त्रास सहन करावा लागत आहे.  

हमीभाव खरेदी केंद्र तात्काळ सुरु करा
जिल्ह्यातील बाजारपेठेत नवीन तूर विक्रीसाठी येत आहे. परंतु, नाफेडच्या वतीने हमीभाव खरेदी केंद्र अद्याप सुरु करण्यात आले नाहीत. त्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या प्रति क्विंटल ५ हजार ४५० रुपयांपेक्षा जवळपास १ हजार रुपये कमी दराने शेतकर्‍यांना खाजगी बाजारपेठेत तुरीची विक्री करावी लागत आहे. त्यामुळे याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देऊन तत्काळ हमीभाव खरेदी केंद्र सुरु करावेत, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. 

Web Title: In Parbhani, only 3500 varieties of peasant farmers were registered under the Basic Purchase Scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.