परभणी: सामूहिक कॉपी प्रकरणी गुन्हे नोंदविण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 12:40 AM2019-03-17T00:40:31+5:302019-03-17T00:41:12+5:30
तालुक्यातील पेडगाव येथील कै. हरिबाई वरपूडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर अनाधिकृत व्यक्ती थांबून सामूहिक कॉपीस प्रोत्साहन दिल्या प्रकरणी केंद्र संचालकासह ५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद मंडळाच्या विभागीय सचिवांनी दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तालुक्यातील पेडगाव येथील कै. हरिबाई वरपूडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर अनाधिकृत व्यक्ती थांबून सामूहिक कॉपीस प्रोत्साहन दिल्या प्रकरणी केंद्र संचालकासह ५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद मंडळाच्या विभागीय सचिवांनी दिले आहेत.
या संदर्भात शिक्षणाधिकारी वंदना वाहुळ यांना दिलेल्या पत्रात विभागीय सचिवांनी नमूद केले आहे की, मंडळाचे वरिष्ठ अधीक्षक ए.बी. जाधव यांनी पेडगाव येथील कै.हरिबाई वरपूडकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या केंद्राला १३ मार्च रोजी भेट दिली. यावेळी संरक्षणशास्त्र विषयाच्या पेपरच्या दिवशी केंद्र संचालक एस.आर. देवकर यांच्या सहकार्याने अनाधिकृत व्यक्ती व्ही.व्ही. जोशी, पी.एन. गादेवाड, अशोक लक्ष्मण घाटुळ, विजयकुमार पांडुरंग मोरे, राहुल प्रभाकर पठारे हे सामूहिकपणे उत्तराच्या छायाप्रतीचा पुरवठा करुन गैरप्रकारास प्रोत्साहन दिल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे केंद्र संचालक एस.आर. देवकर यांच्यासह पाच व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र विद्यापीठ, बोर्ड गैरप्रकार प्रतिबंधक अधिनियम १९८२ (५) (१) (२) नुसार गुन्हा दाखल करावा. तसेच केंद्रावर अनुपस्थित असलेले उपकेंद्र संचालक जगन्नाथ झाडे, सहाय्यक परीरक्षक कºहाळे यांच्याविरुद्ध कारवाई करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना विभागीय सचिवांनी दिल्या आहेत.