परभणी : पाणीपुरवठा योजनांची थकबाकी टंचाई निधीतून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:10 AM2018-12-13T00:10:24+5:302018-12-13T00:11:32+5:30
दुष्काळी भागातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची थकीत विद्युत देयकांची रक्कम टंचाई निधीतून देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे़ त्यामुळे या योजनांचा प्रश्न मार्गी लागणार आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दुष्काळी भागातील ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची थकीत विद्युत देयकांची रक्कम टंचाई निधीतून देण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे़ त्यामुळे या योजनांचा प्रश्न मार्गी लागणार आहे़
राज्यातील १५१ तालुक्यातील २६८ महसुली मंडळात गंभीर दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे़ त्या अनुषंगाने दुष्काळी उपाययोजनांना राज्य सरकारने सुरुवात केली आहे़ त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांची विद्युत देयके थकीत असल्यामुळे अनेक योजना बंद आहेत़ अशा योजना चालू केल्यास पाणीपुरवठा सुरळीत होवू शकतो व टँकर खर्चात बचत होवू शकते, या अनुषंगाने ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांची थकीत विद्युत देयके टंचाई निधीमधून देण्यासंदर्भातील निर्णय राज्य शासनाने घेतला आहे़ या संदर्भात ३० नोव्हेंबर २०१८ रोजी मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक झाली होती़ या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला़ त्यानंतर ११ दिवसांनी या संदर्भातील आदेश राज्याच्या महसूल व वन विभागाने काढला आहे़ त्यानुसार ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजनांची थकीत विद्युत देयकांच्या मुद्दल रक्कमेपैकी ५ टक्के रक्कम सद्यस्थितीत मदत व पुनर्वसन विभागाकडून भरण्यात येणार आहे़ त्यामुळे अशा योजनांचा खंडीत करण्यात आलेला वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा, असेही या संदभातील आदेशात नमूद करण्यात आले आहे़
त्यामुळे या पाणीपुरवठा योजना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे़ राज्य शासनाने ११ डिसेंबर रोजी हा आदेश काढला असला तरी त्याची अंमलबजावणी तातडीने होणे आवश्यक आहे़ जिल्ह्यात अद्याप या अनुषंगाने कार्यवाही झालेली नाही़