परभणी:बाह्य वळण रस्त्यासाठी निधीची प्रतीक्षा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:12 AM2019-03-14T00:12:21+5:302019-03-14T00:13:32+5:30
कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गासाठी परभणी शहराबाहेरून काढलेल्या बाह्य वळण रस्त्याचे काम केवळ भूसंपादनाअभावी ठप्प पडले आहे़ जिल्हा प्रशासनाने भूसंपादनासाठी लागणाऱ्या ६१ कोटी ९६ लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून, निधी उपलब्ध झाला नसल्याने कामे ठप्प पडली आहेत़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कल्याण-निर्मल या राष्ट्रीय महामार्गासाठीपरभणी शहराबाहेरून काढलेल्या बाह्य वळण रस्त्याचे काम केवळ भूसंपादनाअभावी ठप्प पडले आहे़ जिल्हा प्रशासनाने भूसंपादनासाठी लागणाऱ्या ६१ कोटी ९६ लाख रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असून, निधी उपलब्ध झाला नसल्याने कामे ठप्प पडली आहेत़
कल्याण ते निर्मल या राष्ट्रीय महामार्गाचे काम परभणी जिल्ह्याच्या हद्दीत गतीने सुरू असले तरी शहर परिसरात मात्र या कामाला अनेक अडथळे येत आहेत़ शहरातून जाणाऱ्या या मार्गावर वाहतुकीचा येणारा ताण लक्षात घेऊन परभणी शहराबाहेरून १४़५ किमी अंतराचा बाह्य वळण रस्ता मंजूर करण्यात आला़ त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एजन्सी नियुक्त करून या रस्त्याची मोजणी, आवश्यक असलेल्या जमिनीची नोंद घेतली़ महामार्गासाठी संपादित करावयाच्या जमिनीचे गट क्रमांक, शेतकऱ्यांच्या नावांसह यादी राजपत्रात प्रकाशित झाली़
त्यामुळे या मार्गाचे काम आता वेगाने होईल, असे वाटत असतानाच पुन्हा एकदा हे काम ठप्प पडले आहे़ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संपादित करावयाच्या जमिनीची प्रक्रिया पूर्ण केली असून, त्या पुढील प्रक्रिया जिल्हास्तरावरील भूसंपादन विभागाने पूर्ण केली़ या मार्गासाठी संपादित करावयाच्या जमिनीचे मूल्यांकन करण्यात आले़ शेतकºयांच्या सुनावण्या घेण्यात आल्या़ त्यानंतर ज्या शेतकºयांची ही जमीन आहे, त्यांना शासनाकडून मावेजा देण्यासाठी लागणाºया रकमेची मागणी शासनाकडे करण्यात आली़
१४़५ किमी अंतराच्या या रस्त्यासाठी ६१ कोटी ९६ लाख ८८ हजार २५१ रुपये एवढा निधी आवश्यक आहे़ या निधीचा प्रस्ताव येथील भूसंपादन विभागाने फेब्रुवारी महिन्यात शासनाकडे पाठविला आहे़ मात्र निधी उपलब्ध झाला नसल्याने जमीन संपादनाची प्रक्रिया ठप्प पडली आहे़ एकीकडे मानवत तालुक्यापर्यंत या रस्त्याचे काम वेगाने होत आहे़ परभणी शहराच्या पुढे झिरोफाटा ते वसमत, नांदेडपर्यंत या कामाने गती घेतली असताना परभणी शहराबाहेरून काढण्यात आलेल्या बाह्य वळण रस्त्याचे काम मात्र ठप्प आहे़
सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. अशा परिस्थितीत मागणी केलेला हा निधी उपलब्ध होईल की नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे़ त्यामुळे निधीसाठी किमान दोन महिन्यांची तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पाच गावांतील शेतकºयांच्या जमिनी
पाथरी रस्त्यावरील दंत महाविद्यालयापासून ते वसमत रस्त्यावरील असोला पाटीपर्यंत १४़५ किमी अंतराचा हा बाह्य वळण रस्ता तयार केला जाणार आहे़ या रस्त्यासाठी परभणी, धर्मापुरी, पारवा, वांगी आणि असोला या पाच गावांच्या शिवारातील जमीन संपादित करावी लागणार आहे़ पारवा शिवारामधील १़७६ हेक्टर, धर्मापुरी शिवारातील १०़७४ हेक्टर, परभणी शिवारातील ४२़१५ हेक्टर, वांगी शिवारातील १५़८९ हेक्टर आणि असोला शिवारातील १३़९१ हेक्टर अशी ८४़४५ हेक्टर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात अडकली आहे़ जमीन संपादनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल़ त्यामुळे बाह्य वळण रस्त्यासाठी जमीन संपादन हा मुख्य भाग असून, प्रशासनाने पाठपुरावा करावा, अशी मागणी होत आहे़
आचारसंहितेचा अडसर नाही
४जिल्हा प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यामध्ये या जमीन संपादनासाठी ६१ कोटी ९६ लाख रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे़ रस्त्याचे काम सुरू आहे़ त्याचा प्रस्तावही आचारसंहितेपूर्वीच पाठविण्यात आला आहे़ शेतकºयांचे जे पैसे देणे आहेत, ते द्यावेच लागतील़ हा निधी वितरित करण्यात कुठलीही अडचण येणार नाही़ जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव सादर केला असून, निधीची प्रतीक्षा आहे़ हा निधी उपलब्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष भूसंपादनाच्या कामाला सुरुवात केली जाईल, असे भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी विश्वंभर गावंडे यांनी सांगितले़