परभणी: पोहंडुळ ग्रा.पं. कार्यालयासमोर ग्रामस्थांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:56 PM2019-03-11T23:56:00+5:302019-03-11T23:56:21+5:30
तालुक्यातील पोहंडुळ येथील ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराची चौकशी करावी, या मागणीसाठी उपसरपंच माधव नानेकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ११ मार्चपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी) : तालुक्यातील पोहंडुळ येथील ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराची चौकशी करावी, या मागणीसाठी उपसरपंच माधव नानेकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ११ मार्चपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
पोहंडूळ येथील उपसरपंच माधव नाणेकर यांनी मागील तीन वर्षात ग्रामपंचायतीच्या गैरकारभाराबाबत अनेक वेळा गटविकास अधिकारी, ग्रामसेवक यांच्याकडे तक्रारी केल्या; परंतु, सरपंच, ग्रामसेवक व पंचायत समिती प्रशासनाने याकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. या संदर्भात १४ आॅगस्ट २०१८ रोजी गटविकास अधिकाऱ्यांना उपोषणाचा इशारा दिल्यानंतर २८ आॅगस्ट रोजी चौकशी समिती नेमून कारभाराची चौकशी केली. मात्र चौकशीचा अहवाल दिला नाही. या अहवालासाठी उपसरपंच नाणेकर यांनी पुन्हा १९ नोव्हेंबर रोजी पंचायत समितीकडे अर्ज केला होता. त्याचबरोबर १६ जानेवारी २०१९ रोजी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी यांच्याकडेही अर्ज सादर केला होता. यावेळी शौचालय संदर्भात काही ग्रामस्थांची यादी देखील दिली होती. तरी देखील प्रशासनाने या तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे सरपंच, ग्रामसेवक व पंचायत समितीच्या प्रशासनाचा जाहीर निषेध म्हणून उपसरपंच नाणेकर यांच्यासह ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे.