परभणी : लोकसहभागातून वाढविल्या पांगरी शाळेत सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:50 AM2019-06-22T00:50:53+5:302019-06-22T00:51:16+5:30
बदलत्या शैक्षणिक धोरणात भौतिक सुविधांना मोठे महत्त्व आहे. त्यामुळे शासनाच्या मदतीवर अवलंबू न राहता जिंंतूर तालुक्यातील पांगरी येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून ३ लाख रुपयांचा निधी उभारत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भौतिक सुविधांची निर्मिती केली आहे.
विजय चोरडिया।
लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी) : बदलत्या शैक्षणिक धोरणात भौतिक सुविधांना मोठे महत्त्व आहे. त्यामुळे शासनाच्या मदतीवर अवलंबू न राहता जिंंतूर तालुक्यातील पांगरी येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून ३ लाख रुपयांचा निधी उभारत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भौतिक सुविधांची निर्मिती केली आहे.
तालुक्यातील पांगरी येथे जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंत मराठी माध्यमाची शाळा आहे. शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांचा पुढाकार व शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व गावातील शिक्षणप्रेमी तरुणांच्या सहकार्याने शाळेचा कायापालट करण्याचा निर्धार करण्यात आला. त्यासाठी लोकसहभागातून २ लाख ७५ हजारांचा निधी उभारण्यात आला. या निधीतून शाळेच्या परिसरात वृक्षारोपण, रंगरंगोटी व वर्गखोल्यांची दुरुस्ती करण्यात आली. त्याच बरोबर शाळेत डिजीटल हॉल, वाचनालय, बचत बँक व क्रीडा विभागाची निर्मिती करण्यात आली. या भौतिक सुविधांमुळे व शिक्षकांच्या परिणामकारक अध्यापनामुळे पाहता पाहता शाळा गावचे आकर्षण बनली. ेभरीस भर म्हणून गावातील पंढरीनाथ देवस्थान समितीने शाळेला २५ हजार रुपयांचा निधी देऊन प्रवेशद्वारासह सुंदर कमान बनवून दिली. ग्रामपंचायतीनेही पुढाकार घेत पाण्याच्या सुविधेसह क्रीडांगण तयार करून दिले. शाळेचे पालटलेले रूप पाहून इंग्रजी शाळेत शिकायला जाणारे विद्यार्थी गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत प्रवेश घेत आहेत.
शिक्षण विभागाने केला शाळेचा गौरव
२०१६-१७ यावर्षी इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या बारा विद्यार्थ्यांनी पांगरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला. त्यामुळे नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते मुख्याध्यापकांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यशाचा वाढता आलेख पाहून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.