परभणी : दाट धुक्यांत परभणीतील रस्ते झाले गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 12:58 AM2018-12-20T00:58:24+5:302018-12-20T00:58:46+5:30
जिल्ह्यात दोन दिवसांपासून थंडीची लाट पसरली असून, बुधवारी पहाटे दाट धुके पडल्याने या धुक्यामध्ये रस्ते हरवल्याची स्थिती निर्माण झाली होती़ वातावरणात मोठ्या प्रमाणात गारठा निर्माण झाला असून, दिवसभर वातावरणाती गारवा कायम आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्ह्यात दोन दिवसांपासून थंडीची लाट पसरली असून, बुधवारी पहाटे दाट धुके पडल्याने या धुक्यामध्ये रस्ते हरवल्याची स्थिती निर्माण झाली होती़ वातावरणात मोठ्या प्रमाणात गारठा निर्माण झाला असून, दिवसभर वातावरणाती गारवा कायम आहे़
यावर्षी तब्बल एक महिना उशिने थंडीला सुरुवात झाली आहे़ किमान आणि कमाल तापमानामध्ये लक्षणीय घट होत असून, वातावरणात गारवा निर्माण होत आहे़ उत्तर भारतामध्ये हिमवृष्टी होत असल्याने त्याचा परिणाम जिल्ह्यातील वातावरणावर होत आहे़ राज्याच्या सिमावर्ती भागातून थंड वारे वाहत असून, या वाऱ्यामुळे थंडीचा परिणाम अधिक जाणवत आहे़ दोन दिवसांपासून तापमानात मोठी घट झाली आहे़ याच दरम्यान, बुधवारी पहाटे दाट धुके पसरले होते़ जिल्ह्यातील सर्वच भागामध्ये धुक्याची चादर पसरल्याने पहाटे रस्ते धुक्यामध्ये गायब झाले होते़
सकाळी ७ वाजेपर्यंत रस्त्यांवर धुके होते़ त्यामुळे या धुक्यातून वाट काढताना वाहनधारकांना चक्क हेडलाईट लावून वाहने चालवावी लागली़ मंगळवारी रात्री देखील मोठ्या प्रमाणात थंडी होती़ ठिक ठिकाणी शेकोट्या पेटवून आणि उबदार कपड्यांचा वापर करून थंडीपासून बचाव केला जात आहे़ वाढलेल्या थंडीमुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे़ सकाळची कामे उशिराने सुरू होत असून, सायंकाळी ७ वाजेनंतर रस्ते सुनसान पडत आहेत़ दिवसभर गारवा असल्याने गारवा जाणवत आहे़
१० वर्षानंतर आले पांढरे दाट धुके
४परभणी जिल्ह्यात १० वर्षानंतर पहिल्यांदाच पांढरे दाट धुके बुधवारी पहाटे पसरल्याचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ़ के़ के़ डाखोरे यांनी सांगितले़
४वातावरणात वारा नसल्याने धुक्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली़ दवबिंदूचे धुक्यात रुपांतर झाले़ त्यामुळे कमी अंतरावरील दिसण्याची क्षमता कमी जानवली़, असेही यावेळी डॉ़ डाखोरे यांनी सांगितले़ बुधवारी सकाळी ८़३० वाजेपर्यंत शहर व परिसरात धुके दिसून आले़
किमान तापमान ९़६ अंशावर
जिल्ह्यात थंडीची लाट निर्माण झाली असून, बुधवारी जिल्ह्याचे किमान तापमान ९़६ अंश एवढे निच्चांकी नोंद झाले आहे़ विशेष म्हणजे कमाल तापमानही २५ अंशापर्यंत पोहचले आहे़ यावर्षीच्या हिवाळ्यात १५ दिवसांपूर्वी पारा ९ अंशापर्यंत उतरला होता़ त्यानंतर बुधवारी पुन्हा तापमानात लक्षणीय घट झाल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने दिली़