परभणी : मानव विकासची बस पालकांनीच रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 12:38 AM2018-09-04T00:38:41+5:302018-09-04T00:39:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोली (परभणी) : शालेय विद्यार्थिनींसाठी सुरु करण्यात आलेली मानव विकास मिशनची बस नेहमीच उशिराने येत असल्याने संतप्त झालेल्या पालकांनी सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास तब्बल तीन तास बस रोखून धरली. एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
मानवत तालुक्यातील मानोली येथून दररोज ५० ते ६० विद्यार्थिनी मानवत येथे शिक्षणासाठी ये-जा करतात. याकरीता मानव विकासच्या माध्यमातून मानोली येथून सकाळी ७ वाजता मानवतसाठी एस.टी. बस सुरु करण्यात आली होती; परंतु, गेल्या काही दिवसांपासून ही बस सातत्याने उशिराने येत आहे. काही वेळा तर ही बस रद्दही केली जाते. त्यामुळे विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालक संतप्त झाले होते. याबाबत वाहक व चालकांकडे तक्रारी करुनही सुधारणा झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मानोली येथे आलेली बस रोखून धरली व नेहमी उशिराने बस का येते, याचा जाब वाहक व चालक यांना विचारला. जोपर्यंत एस.टी. महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी येणार नाहीत, तोपर्यंत एस.टी. बस सोडणार नाही, अशी भूमिका पालकांनी घेतली. जवळपास ३ तासानंतर एस.टी. महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी मानोली येथे आले व त्यांनी यापुढे वेळेत बस पाठविली जाईल, असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.