परभणी : निवडणुकीच्या तोंडावर पक्षीय गटबाजी चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 12:03 AM2019-09-18T00:03:22+5:302019-09-18T00:04:38+5:30

विधानसभा निवडणुकीच्या तारखा येत्या १ ते २ दिवसांत जाहीर होण्याची शक्यता असताना जिल्ह्यात प्रमुख राजकीय पक्षांमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, स्वकियांची खेचाखेची करून सोयीचे राजकारण तडीस नेण्याचा ‘परभणी पॅटर्न’ पुन्हा एकदा सक्रिय झाला असल्याचे पहावयास मिळत आहे़

Parbhani: Party factionalism in the face of elections | परभणी : निवडणुकीच्या तोंडावर पक्षीय गटबाजी चव्हाट्यावर

परभणी : निवडणुकीच्या तोंडावर पक्षीय गटबाजी चव्हाट्यावर

Next

अभिमन्यू कांबळे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : विधानसभा निवडणुकीच्या तारखा येत्या १ ते २ दिवसांत जाहीर होण्याची शक्यता असताना जिल्ह्यात प्रमुख राजकीय पक्षांमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, स्वकियांची खेचाखेची करून सोयीचे राजकारण तडीस नेण्याचा ‘परभणी पॅटर्न’ पुन्हा एकदा सक्रिय झाला असल्याचे पहावयास मिळत आहे़
पक्ष निष्ठा बाजुला ठेवून सोयीचे राजकारण करण्याचा ‘परभणी पॅटर्न’ गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यात बिनदिक्कतपणे सुरू आहे़ विरोधी पक्षातील नेत्याचा पराभव करण्याऐवजी स्वपक्षीयांची खेचाखेची करून त्यांचेच पानीपत करण्याची उठाठेव अनेक वर्षांपासून जिल्ह्यात सुरू आहे़ त्यामुळेच आजपर्यंत परभणीला राज्यस्तरावरील नेता मिळू शकलेला नाही़ राजकारणात वैयक्तीत मतभेद असू शकतात़ सार्वजनिक जीवनात काम करीत असताना विचारभिन्नता असणे स्वाभावीक आहे; परंतु, जिल्ह्याच्या राजकारणात विचारभिन्नतेपेक्षा विचारशून्यता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे़ प्रत्येक निवडणुकीत सातत्याने आढळणारा हा गुण या विधानसभा निवडणुकीतही प्रकर्षाने जाणवू लागला आहे़
जिल्ह्याने काही दिवसांपुर्वीच तसा लोकसभेलाही अनुभव घेतला होता़ आता विधानसभेची निवडणूक १९ किंवा २० सप्टेंबर रोजी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे़ या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात वाढू लागल्या आहेत़ गेल्या ४० वर्षांपासून जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व मिळविलेल्या शिवसेनेतही पहिल्या निवडणुकीनंतर सुरू झालेले राजकीय हेवेदाव्याच राजकारण आजही कायम आहे़ या राजकारणात अनेक नेते मंडळींचे राजकीय करीअर संपून गेले़ तर अनेकांनी करीअरही केले; परंतु, परिस्थितीमध्ये मात्र बदल होत नाही़ जिल्ह्यात सद्यस्थितीतही शिवसेनेचे खा़ बंडू जाधव व आ़ डॉ़ राहुल पाटील यांचे दोन गट कायम असून, हे दोन गट एकमेकास आजही पाण्यात पाहत आहेत़ कुरघोडी करण्याची संधी त्यांच्याकडून सोडली जात नाही़ अशीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिसून येत आहे़ जिल्हाध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी व शहराध्यक्ष अ‍ॅड़ स्वराजसिंह परिहार यांच्यात गेल्या काही महिन्यांमध्ये कमालीचे मतभेद निर्माण झाले आहेत़ लोकसभा निवडणुकीला त्याचा परभणीकरांना प्रत्यय आला आहे़ आता विधानसभेला पुन्हा हे मतभेद चर्चेला आले आहेत़ निमित्त ठरले आहे, परभणी विधानसभेच्या जागेचे़ आ़ दुर्राणी यांनी काँग्रेसकडून सुरेश नागरे यांना परभणी विधानसभेची उमेदवारी देण्यास तिव्र विरोध केला आहे तर अ‍ॅड़ परिहार यांनी पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य राहील़ त्यामुळे युतीच्या उमेदवाराला फायदा होईल, असे स्टेटमेंट करून वातावरण गढूळ करू नका, असा सल्ला दुर्राणी यांना दिला आहे़
काँग्रेस पक्षातही फारसे आलबेल नाही़ या पक्षातील नेत्यांमध्येही तीव्र मतभेद आहेत़ अशातच काँग्रेस पक्षाला जिल्हाभरात एकसंघतेने बांधून ठेवणारा नेता मिळेनासा झाला आहे़ त्यामुळे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत़ परिणामी प्रत्येक मतदारसंघात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भूमिका सोयीने ठरविली जात आहे़ राज्य व राष्ट्रीय पातळीवर सत्तेत असलेला भाजपाही याला अपवाद नाही़ उघड-उघड या पक्षातील नेते बोलत नसले तरी खाजगीमध्ये ते एकमेकांची खेचाखेची करण्याची संधी सोडत नाहीत़ त्यामुळे कार्यकर्त्यांची गोची होते़ जिल्ह्यातील विविध पक्षातील नेते आपसातील मतभेद बाजुला सारून कधी विधानभवनात तर कधी देवगिरी एक्सप्रेसमध्ये तर कधी मंत्रालयात हास्यविनोद करताना दिसून येतात़ इकडे कार्यकर्ते मात्र एकमेकांचे शत्रू असल्यासारखे वागतात़ त्यातूनच आक्रमक भूमिका घेवून हाणामाऱ्यांचे प्रकारही जिल्ह्यात घडले आहेत़ या निवडणुकीतही असाच काहीसा अनुभव जिल्ह्याला येत असला तरी त्यामध्ये सुधारणा होण्याचीही शक्यता वाटत नाही़ प्रामाणिक कार्यकर्त्यां संदर्भात एक शायर म्हणतात़़़ भरे बाजार में अक्सर खाली हात लौंट आता हूं़़़ पहले पैसे नही थे अब ख्वाईशे नही रही़़़
असे आहेत जिल्ह्यातील नेत्यांमध्ये मतभेद
४जिल्ह्यात शिवसेनेत खा़ बंडू जाधव आणि आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्यात मतभेद आहेत़ भाजपात माजी आ़ विजय गव्हाणे आणि महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांच्यात मतभेद आहेत़ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी आणि महानगराध्यक्ष अ‍ॅड़ स्वराजसिंह परिहार, माजी महापौर प्रताप देशमुख यांच्यात मतभेद आहेत़ तसेच गंगाखेडचे आ़ डॉ़ मधुसूदन केंद्रे आणि जिल्हाध्यक्ष आ़ बाबाजानी दुर्राणी यांच्यातही कमालीचे मतभेद आहेत़
काँग्रेसमध्ये सर्व स्वतंत्रच
४जिल्ह्यात काँग्रेस पक्षातील मतभेद हा जाहीरपणे चर्चेचा फारसा विषय झाला नसला तरी या पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्येही बरेच मतभेद आहेत़ जिल्हाध्यक्ष सुरेश वरपूडकर यांच्या मनपातील भूमिकेला अनेक वेळा त्यांच्याच पक्षातील नगरसेवकांनी विरोध केला आहे़ दुसरीकडे काँग्रेसच्याच चिन्हावर निवडून आलेले गंगाखेड आणि सोनपेठचे नगराध्यक्ष कधीही काँग्रेसच्या कार्यक्रमात दिसत नाहीत़ तसा विषयही कधी जिल्हाध्यक्ष वरपूडकर यांनी केला नाही़

Web Title: Parbhani: Party factionalism in the face of elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.