परभणी : राष्ट्रभक्तीच्या प्रेमाला कष्टाचा साज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2020 11:58 PM2020-01-11T23:58:31+5:302020-01-12T00:23:48+5:30

राष्ट्रभक्तीच्या प्रेमातून देशाच्या सैन्य दलात रुजू होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी दररोज किमान ४ तास तयारी करून आपार कष्टाच्या प्रचितीची अनुभूती राज्यातील ९ जिल्ह्यांमधील तरुणांनी परभणीत आणून दिली आहे़ कडाक्याच्या थंडीत तरुणांकडून घेतल्या जाणाऱ्या या मेहनतीचे मूल्य ओळखून परभणीकरांनीही दातृत्वाच्या भावनेतून त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा मोठेपणा दाखविल्याचा प्रत्यय गेल्या ८ दिवसांमध्ये पहावयास मिळाला़

Parbhani: The path of hardship to the love of patriotism | परभणी : राष्ट्रभक्तीच्या प्रेमाला कष्टाचा साज

परभणी : राष्ट्रभक्तीच्या प्रेमाला कष्टाचा साज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राष्ट्रभक्तीच्या प्रेमातून देशाच्या सैन्य दलात रुजू होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी दररोज किमान ४ तास तयारी करून आपार कष्टाच्या प्रचितीची अनुभूती राज्यातील ९ जिल्ह्यांमधील तरुणांनी परभणीत आणून दिली आहे़ कडाक्याच्या थंडीत तरुणांकडून घेतल्या जाणाऱ्या या मेहनतीचे मूल्य ओळखून परभणीकरांनीही दातृत्वाच्या भावनेतून त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा मोठेपणा दाखविल्याचा प्रत्यय गेल्या ८ दिवसांमध्ये पहावयास मिळाला़
परभणी येथे भारतीय सैन्य दलाच्या वतीने राज्यातील औरंगाबाद, जालना, हिंगोली, परभणी, जळगाव, नांदेड, धुळे, नंदूरबार आणि बुलडाणा या ९ जिल्ह्यांतील युवकांची सोल्जर जीडी, सोल्जर टेक्निकल आणि ट्रेडर्समन या तीन पदांसाठी ४ ते १३ जानेवारी दरम्यान भरती प्रक्रिया घेण्यात येणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते़ त्यानुसार या ९ जिल्ह्यातील तब्बल ६५ हजार युवकांनी भरतीसाठी आॅनलाईन नोंदणी केली होती़ त्यानुसार ४ जानेवारीपासून परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अश्वमेध क्रीडा मैदानावर भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला़ परभणीत गेल्या १५ ते २० दिवसांपासून कडाक्याची थंडी सुरू आहे़ या कडाक्याच्या थंडीत रात्री १२ वाजता भरती प्रक्रियेला सुरुवात झाली़ सैन्य दलाची भरती आणि इतर सुरक्षा व्यवस्थेच्या भरती प्रक्रियेत मोठा फरक असतो़ कडक नियम, कठोर शारीरिक मेहतन, संयम आणि कडव्या शिस्तीचे दर्शन या भरती प्रक्रियेत पाहावयास मिळते़ सैन्य दलातील अधिकाऱ्यांची अपेक्षा ओळखून तरुणांनीही या भरती प्रक्रियेसाठी मोठी मेहनत घेतल्याचे त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर दिसून आले़ गेल्या काही वर्षात भारतीय सीमेवर शेजारी राष्ट्रांच्या वाढलेल्या हालचाली आणि त्याला भारतीय सैन्याने दिलेले चोख उत्तर, या घटनांच्या पार्श्वभूमीवर तरुणांमध्ये राष्ट्रभक्तीचे स्फुरण चढल्याचा अनुभवही या भरती प्रक्रियेच्या निमित्ताने पहावयास मिळाला़ सैन्य दलात केवळ नोकरी मिळवून बेरोजगारीची समस्या सुटते, म्हणून नव्हे तर निखळ राष्ट्रभक्तीतून देशसेवेला वाहून घेण्याचा दृढनिश्चय केल्याचेही या तरुणांशी केलेल्या चर्चेतून दिसून आले़ धुळे जिल्ह्यातील साखरी तालुक्यातील सय्यदनगर गावातील १९ वर्षीय पंकज राठोड म्हणतो की, घरची आर्थिक परिस्थिती बिकट आहे़ वडील आजारी असतात़ आई मजुरी करते़ भाऊ कपड्याच्या दुकानात काम करून शिक्षण घेतो़ त्यामुळे कुटुंबाला आधार देण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे़ याच जबाबदारीतून नोकरी मिळविणे जेवढे महत्त्वाचे वाटते तेवढ्याच सन्मानाची नोकरी मिळणे हेही गरजेचे वाटते़ त्यातूनच भारतीय सैन्य दलात भरती होण्याचा निर्णय घेतला़ यासाठी दररोज सकाळी ५ ते ७ आणि सायंकाळी ५ ते ७ अशी चार तास गेल्या काही महिन्यांपासून तयारी करीत आहे़ यापूर्वी पुण्याच्या भरती प्रक्रियेत सहभाग नोंदविला होता; परंतु, तेथे यश मिळाले नाही़ आता पुन्हा परभणीत भरतीला आलो आहे़ येथे यश मिळेल की नाही, माहीत नाही; परंतु, १०० टक्के तयारी केली आहे व त्यात आपल्याला यश मिळणार हा आत्मविश्वास आहे़ जालना येथील २० वर्षाचा अमोल टेकाळे म्हणतो, सैन्य भरतीसाठी सकाळी ५ वाजता उठून दोन तास मैदानी तयारी करीत असतो़ सायंकाळी एक तास धावणे व इतर मैदानी चाचणीची तयारी करतो़ लेखी परीक्षेसाठी स्पर्धा परीक्षेचे वर्ग लावले आहेत़ सैन्य दलात भरती होऊन देशसेवा करण्याची इच्छा आहे़ त्यासाठी लागेल तेवढे कष्ट करण्याची तयारी आहे व त्यामध्ये सातत्येही ठेवले आहे़ परिणामी, एक ना एक दिवस यात यश मिळेल, असा विश्वास वाटतो़ परभणीतील सिद्धांत कुरोलू या २० वर्षीय तरुणानेही सैन्य दलात भरती होण्याच्या इराद्याने गेल्या काही महिन्यांपासून जोरदार मैदानी सराव सुरू केला आहे़
पहाटे दोन तास भरतीची तयारी करतो व सायंकाळी ५ वाजता धावण्याचा सराव नियमित करीत आहे़ बारावी वाणिज्य शाखेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर सैन्य दलात भरती होणे हाच एकमेव उद्देश त्याने डोळ्यासमोर ठेवला आहे़ त्यातूनच ही तयारी सुरू केली आहे़ धुळे जिल्ह्यातील सिद्धखेडा तालुक्यातील बेटावद येथील १९ वर्षीय तुषार साळुंके म्हणाला, लहानपणापासूनच भारतीय सैन्यात दाखल होण्याची आवड आहे़ त्याच दृष्टीकोनातून तयारी केली आहे़ यापूर्वी जळगाव, मुंबई येथे भरती प्रक्रियेत सहभाग नोंदविला़; मैदानी तयारीत कमी पडल्यामुळे अपयश पदरी पडले; परंतु, या अपयशाने आपण खचून जाणार नाही़ उलट त्यातून प्रेरणा घेऊन निश्चितच यश मिळवत सैन्य दलात भरती होऊ, असा आत्मविश्वास त्याने व्यक्त केला़
बुलडाणा जिल्ह्यातील शिरकूर येथील योगेश विजय चवंड याने काही महिन्यांपूर्वीच वयाची १८ वर्षे पूर्ण केली आहेत़ त्याने अद्याप मतदानाचा अधिकारही बजावलेला नाही़ तरीही त्याला देशप्रेमातून सैन्य दलात भरती व्हायचे आहे़ यासाठी दररोज सकाळी ५ वाजता उठून धावण्याचा सराव तो करतो़ दीड वर्षांपासून या सरावात सातत्य आहे व पहिल्यांदाच सैन्य दलाच्या भरतीसाठी परभणीत आलो आहे़ त्यामुळे या भरती प्रक्रियेतून मिळणारा अनुभव आयुष्यभरासाठी लक्षात राहणारा आहे, असे योगेश म्हणाला. यावेळी बुलडाणा जिल्ह्यातील शिरकूर येथील अकाश पंढरी सुसर, धुळे जिल्ह्यातील बेटावद येथील राकेश सुनील भोई, सय्यद नगर येथील आकाश राठोड, साखरी तालुक्यातील ढोलीपाडा येथील संदीप रतनलाल चव्हाण, विजापूर येथील योगेश काळे, भूषण भोई, सिद्धार्थ सैदाने, निजामपूर येथील मनोज सूर्यवंशी, विजापूर येथील आकाश हलवर या तरुणांनीही अशाच काहीशा प्रतिक्रिया दिल्या़
तरुणांच्या मदतीसाठी धावले परभणीकर
कडक्याच्या थंडीत मध्यरात्रीच भरती प्रक्रिया सुरू होत असल्याने परजिल्ह्यातून आलेल्या तरुणांना राहण्याची कुठलीही व्यवस्था संबंधित प्रशासनाकडून करण्यात आलेली नव्हती़ त्यामुळे हे तरुण रस्त्यावर आणि जागा मिळेल, तेथे रात्रीच्या वेळी झोपताना पहिले दोन दिवस दिसून आले़ शिवाय त्यांच्या जेवणाची आबाळही होताना पाहावयास मिळाली़ ही बाब लक्षात आल्यानंतर परभणीतील अनेक सामाजिक संस्था, सेवाभावी व्यक्तींनी पुढाकार घेऊन त्यांच्या निवासाची व्यवस्था केली़ शिवाय जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली़ काहींनी या विद्यार्थ्यांना फराळ व पाणी बाटल्या दिल्या. विशेष म्हणजे गेल्या आठ दिवसांपासून यात सातत्य असून, भरती प्रक्रियेच्या परिसरासोबतच शहरातील विविध भागातही अशी व्यवस्था परभणीकरांनी केल्याचे दिसून आले़ त्यामुळे भरतीसाठी आलेल्या तरुणांनी समाधान व्यक्त करून परभणीकरांचे ऋण व्यक्त केले़
अपार मेहनतीतून उमेशने मैदानी चाचणीत मिळविले यश
यावेळी भरती प्रक्रियेसाठी आलेल्या तरुणांशी चर्चा करताना जालना जिल्ह्यातील रेवगाव येथील उमेश सर्जेराव चोेंढे हा युवक भेटला़ उमेश गेल्या दोन वर्षांपासून सैन्य दलाच्या भरतीसाठी तयारी करीत आहे़ यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली़ जळगाव येथील भरती प्रक्रियेत त्याने सहभाग नोंदविला होता़ तेथे त्याला अपयश आले; परंतु, राष्ट्रभक्तीचे स्फूरण चढलेल्या उमेशला हे अपयश रोखू शकत नव्हते़ त्यामुळे त्याला जसे परभणीत भरती प्रक्रिया आहे, असे समजले़ त्याने तातडीने नोंदणी करून ठरलेल्या दिवशी परभणी गाठली़ शारीरिक चाचण्यांमध्ये तो उत्तीर्ण झाला असून, आता त्याची वैद्यकीय चाचणी होणार आहे़ या चाचणीनंतर २३ फेब्रुवारी रोजी होणाºया लेखी परीक्षेसाठी तो पात्र ठरणार आहे़ लेखी परीक्षेनंतर खºया अर्थाने तो सैन्य दलात जवान म्हणून रुजू होईल़ यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे़ मैदानी चाचण्याची तयारी तर केलीच होती़ लेखी परीक्षेचीही तयारी चांगल्या पद्धतीने केली आहे़ त्यामुळे या परीक्षेतही लिलया यश मिळवू, असा त्याने आत्मविश्वास बोलून दाखविला़

Web Title: Parbhani: The path of hardship to the love of patriotism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.