परभणी : अवयवदानाच्या जनजागृतीसाठी ६६४ कि.मी.ची पदयात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 12:36 AM2018-11-19T00:36:35+5:302018-11-19T00:39:17+5:30
अवयवदान ही चळवळ ग्रामीण भागात रुजविण्यासाठी द फेडरेशन आॅफ आॅर्गन अॅण्ड बॉडी डोनेशन या संस्थेच्या माध्यमातून ८ ज्येष्ठ नागरिकांनी औरंगाबाद ते तुळजापूर अशी ६६४ कि.मी.अंतराची पदयात्रा सुरु केली आहे. सध्या ही यात्रा जालना जिल्ह्यात असून २ डिसेंबर रोजी परभणी जिल्ह्यात अवयवदानाची जनजागृती केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : अवयवदान ही चळवळ ग्रामीण भागात रुजविण्यासाठी द फेडरेशन आॅफ आॅर्गन अॅण्ड बॉडी डोनेशन या संस्थेच्या माध्यमातून ८ ज्येष्ठ नागरिकांनी औरंगाबाद ते तुळजापूर अशी ६६४ कि.मी.अंतराची पदयात्रा सुरु केली आहे. सध्या ही यात्रा जालना जिल्ह्यात असून २ डिसेंबर रोजी परभणी जिल्ह्यात अवयवदानाची जनजागृती केली जाणार आहे.
अवयवदान ही काळाची गरज असून या संदर्भात राज्यभरात अनेक सेवाभावी संस्था कार्यरत असल्या तरी हा विषय अजूनही दुर्लक्षित आहे. परंपरेच्या जोखडात अडकलेला समाज अवयवदानाला सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याने द फेडरेशन आॅफ आॅर्गन अॅण्ड बॉडी डोनेशन या संस्थेने अवयवदानाच्या चळवळीसाठी पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागात या चळवळीची जनजागृती करण्यासाठी ६७ वर्षीय सुनील देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली १६ नोव्हेंबरपासून पदयात्रेला सुरुवात झाली आहे. ही पदयात्रा औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूरमार्गे २४ डिसेंबर रोजी तुळजापूर येथे पोहचणार आहे. दररोज २० कि.मी. अंतर पायी चालत ठिकठिकाणी जनजागृती केली जात आहे. परभणी येथे २ डिसेंबर रोजी ही पदयात्रा पोहचणार असून विविध सामाजिक संस्था, आरोग्य संस्था व ग्रामीण भागात अवयवदानाविषयी जनजागृती केली जाणार आहे. या पदयात्रेत दयानंद मठपती (लातूर), प्रियदर्शन बापट (नाशिक), चंद्रशेखर देशपांडे (नवी मुंबई), शैलेश देशपांडे, अविनाश कुलकर्णी, सुनील देशपांडे यांचा समावेश आहे.
दोन पदयात्रा झाल्या पूर्ण
द फेडरेशन आॅफ आॅर्गन अॅण्ड बॉडी डोनेशन या संस्थेने यापूर्वीही अवयवदानाच्या जनजागृतीसाठी दोन पदयात्रा पूर्ण केल्या आहेत. २५ नोव्हेंबर ते २१ जानेवारी २०१७ या काळात नाशिक ते नागपूर अशी १३४० कि.मी.ची पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर पुरुषोत्तम पवार यांच्या नेतृत्वाखाली २३ फेब्रुवारी रोजी केईएम हॉस्पिटल मुंबई येथून सुरु झालेली पदयात्रा ८५० अंतर कि.मी. पार करुन १५ एप्रिल २०१८ रोजी मडगाव (गोवा) येथे पोहचली. आता तिसरी पदयात्रा काढली जात आहे.