परभणी : रस्त्यावर थुंकल्यास, मास्क न लावल्यास दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2020 11:25 PM2020-04-17T23:25:55+5:302020-04-17T23:26:46+5:30
परभणी शहरात कोरोना पॉझिटिव्ह एक रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनाने आता कडक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी शहरात कोरोना पॉझिटिव्ह एक रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासनाने आता कडक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात यापुढे सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास १०० रुपयांचा तर चेहऱ्यावर मास्क न वापरल्यासही १०० रुपयांचा दंड आकारला जाणार असून दुसऱ्यांदा या नियमांचे उल्लंघन केल्यास फौजदारी कार्यवाही केली जाणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी शुक्रवारी काढला.
कोरोनाच्या अनुषंगाने काढण्यात आलेल्या आदेशात प्रशासनाने कठोर पाऊले उचलली आहेत. त्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच रस्ते, बाजार, रुग्णालय, शासकीय कार्यालय आदी ठिकाणी थुंकल्यास १०० रुपये तर सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्यासही १०० रुपये दंड करण्यात येणार आहे. तसेच दुकानावर फळभाजीपाला विक्रेते, सार्वजनिक जीवनाश्यक वस्तू विक्रेते व ग्राहक यांनी सामाजिक अंतर न ठेवल्यास (दोन ग्राहकांमध्ये कमीत कमी ३ फूट अंतर) न राखल्यास किंवा विक्रेत्यांनी मार्किंग न केल्यास ग्राहकास १०० रुपये तर संबंधित दुकानदारास ५०० रुपये दंड आकारला जाणार आहे. किराणा व जीवनाश्यक वस्तू विक्रेत्यांनी मुख्य वस्तुंचे दरपत्रक न लावल्यास १ हजार रुपये तर सार्वजनिक ठिकाणी एखादी व्यक्ती विनाकारण आढळून आल्यास २०० रुपये दंड लावण्यात येणार आहे. एखादी व्यक्ती दुचाकीवरुन वैयक्तिक वापरासाठीचा भाजीपाला, किराणा, औषधी घेऊन जात असल्याचे सांगून अनावश्यक फिरत असल्याचे आढळून आल्यास २०० रुपये दंड आकारला जाणार आहे. या सहाही नियमांचे दुसºयांदा उल्लंघन केल्या फौजदारी कारवाई केली जाणार आहे. या आदेशाची कार्यवाही करण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना नियुक्त करण्यात आले आहे.
४या प्रकरणी संबंधित क्षेत्रांमध्ये कारवाई करण्याची जबाबदारी महानगरपालिका, नगरपालिका व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांवर सोपविण्यात आली असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.