परभणी : कापसीकरांचे पिण्याच्या पाण्यासाठी होताहेत हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 11:42 PM2019-04-12T23:42:49+5:302019-04-12T23:42:56+5:30
मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तन अभियानामध्ये तालुक्यातील कापशी या गावाची निवड करण्यात आली आहे. या अभियानात मागील दोन वर्षापासून गावात कामे चालू आहेत; परंतु, अद्यापही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही. पिण्याच्या पाण्यासाठी कापशीकरांचे अतोनात हाल होत असून घागरभर पाण्यासाठी ग्रामस्थ व महिलांंना २ कि.मी.ची पायपीट करीत भटकंती करावी लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालम (परभणी): मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तन अभियानामध्ये तालुक्यातील कापशी या गावाची निवड करण्यात आली आहे. या अभियानात मागील दोन वर्षापासून गावात कामे चालू आहेत; परंतु, अद्यापही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला नाही. पिण्याच्या पाण्यासाठी कापशीकरांचे अतोनात हाल होत असून घागरभर पाण्यासाठी ग्रामस्थ व महिलांंना २ कि.मी.ची पायपीट करीत भटकंती करावी लागत आहे.
गंगाखेड ते पालम राष्ट्रीय महामार्गापासून २ कि.मी. अंतरावर कापशी हे गाव आहे. या गावची लोकसंख्या १२०० असून पिण्याच्या पाण्यासाठी गावाशेजारच्या पाझर तलावावर अवलंबून राहावे लागते. २०१६ मध्ये शासनाने मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तन अभियानात या गावाची निवड केली आहे. या अभियानात निवड झाल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासह गावातील प्रश्न सुटतील अशी अपेक्षा होती; परंतु, अद्यापही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. पाझर तलाव आटल्याने व गावाजवळून गेलेली नदी कोरडी पडल्याने गावाच्या शिवारात पाण्याची पातळी कमालीची घटली आहे. जलसंधारणाची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. दुष्काळ पडल्याने गावाजवळ पिण्याच्या पाण्याचे स्रोत नसल्याने तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. घागरभर पाण्यासाठी रात्रंदिवस जागरण करून २ कि.मी. पायपीट जानेवारी महिन्यापासून सुरू झाली आहे. आणखी दोन महिने पिण्याच्या पाण्यासाठी काय होणार? या भितीने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. शासनाने ग्रामपरिवर्तन अभियानात गावाची निवड करूनही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मात्र सुटलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. याकडे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने लक्ष देऊन कापसीमधील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे.
खाजगी टँकरवर भागतेय तहान
पिण्याच्या पाण्यासाठी गावानजिक पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. पालम शहरातून पिण्याच्या पाण्यासाठी खासगी टँकर बोलविण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. एका टँकरला २ हजार रुपये खर्च करून ७ हजार लिटर पाणी विकत घ्यावे लागत आहे. दोन-तीन कुटुंब एकत्र येऊन खासगी टँकर मागून घेत आहेत. त्यामुळे दुष्काळाच्या संकटात ग्रामस्थांच्या खिशाला झळ बसत आहे.
अधिग्रहणाचे प्रस्ताव देऊनही दुर्लक्ष
पिण्याच्या पाण्यासाठी मागील महिनाभरापासून पंचायत समितीकडे टँकर व विंधन विहीर अधिग्रहणाचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे; परंतु, या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. अधिकारी व कर्मचारी निवडणुकीचे काम सांगून प्रस्तावाकडे दुर्लक्ष करीत आहेत. उपविभागीय अधिकारी कार्यालयात तर कर्मचारी ग्रामस्थांना माहिती देताना उडवा-उडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी संकटाचा सामना करावा लागत आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष नामदेव जाधव यांनी सांगितले.