परभणी : लेखी परीक्षेनंतरच शारीरिक चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:55 AM2019-02-17T00:55:50+5:302019-02-17T00:56:19+5:30
पोलीस दलातील भरती प्रक्रियेच्या पद्धतीत बदल करण्यात आला असून सुरुवातीला लेखी परीक्षा घेऊन या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : पोलीस दलातील भरती प्रक्रियेच्या पद्धतीत बदल करण्यात आला असून सुरुवातीला लेखी परीक्षा घेऊन या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी दिली.
महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाच्या स्वरुपात बदल झाला आहे. त्यामुळे पोलीस शिपाई या पदावर बुद्धीमान उमेदवारांची निवड होणे आवश्यक असल्याने तसेच भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणी दरम्यान होणाºया दुर्घटना लक्षात घेऊन शासनाने १८ जानेवारी २०१९ रोजी एक आदेश काढून या प्रक्रियेत बदल केला आहे. या नव्या पद्धतीमुळे पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत सुरुवातीला लेखी परीक्षा घेतली जाणार असून या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थ्यांपैकी पोलीस घटक कार्यालयाच्या आस्थापनेवर रिक्त होणाºया पदांच्या प्रमाणात आवश्यक तेवढ्याच उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलाविले जाणार आहे. यामुळे भरती प्रक्रियाही गतीने होणार असून या बदलांचा उमेदवारांनाही फायदा होणार आहे, असे पोलीस अधीक्षक उपाध्याय यांनी सांगितले.
शारीरिक चाचणीवर उमेदवारांचा भर
यापूर्वी पोलीस भरती प्रक्रियेची तयारी करण्यासाठी उमेदवार शारीरिक चाचणीवर भर देत होते. भरती प्रक्रियाही याच पद्धतीने पार पडत असे. पोलीस भरतीच्या दरम्यान सुरुवातीला शारीरिक चाचणीचे टप्पे होत होते. या शारीरिक चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जात होती. आता या पद्धतीत बदल करण्यात आला आहे. सुरुवातीलाच लेखी परीक्षा घेतली जाणार असून त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार आहे. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाºया युवकांना आता लेखी परीक्षेवर भर द्यावा लागणार आहे.