परभणी : दिव्यांग व्यक्तीस दिली पिठाणी गिरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 11:24 PM2019-04-22T23:24:35+5:302019-04-22T23:24:50+5:30
संकल्प स्वराज्य उभारणीचा या संस्थेच्या वतीने गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथील दिव्यांग व्यक्तीला व्यवसायासाठी पिठाची गिरणी भेट देण्यात आली आहे. या संस्थेने सामाजिक कार्याअंतर्गत मदतीची चळवळ सुरु केली असून त्यास गती मिळत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : संकल्प स्वराज्य उभारणीचा या संस्थेच्या वतीने गंगाखेड तालुक्यातील पडेगाव येथील दिव्यांग व्यक्तीला व्यवसायासाठी पिठाची गिरणी भेट देण्यात आली आहे. या संस्थेने सामाजिक कार्याअंतर्गत मदतीची चळवळ सुरु केली असून त्यास गती मिळत आहे.
संकल्प स्वराज्य उभारणी या संस्थेच्या वतीने दोन वर्षांपासून समाजातील निराधार, वंचित घटकाला मदत करण्याचा पायंडा पाडला आहे. सण, उत्सवांचे निमित्त साधून अशा व्यक्तींना मदत देण्यासाठी ही संस्था पुढाकार घेत आहे. या अंतर्गतच या संस्थेचे राम भोसले यांनी २१ एप्रिल रोजी पडेगाव येथील गोविंद वरकडे यांना पिठाची गिरणी आणि मिरची कांडप यंत्र भेट देऊ केले आहे. गोविंद वरकडे हे पडेगाव येथील रहिवासी असून दोन मुले आणि वृद्ध आई एका पडक्या घरात राहून जीवनाशी संघर्ष करीत आहेत. उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने या कुटुंबाची होरपळ होत होती. उन्हा-तान्हात शेतात काम करुन गोविंद हे कुटुंब पोसतात; परंतु, अपंगत्वामुळे त्यांना काम करणेही शक्य होत नसल्याने संकल्प स्वराज्य उभारणी फाऊंडेशनने मदतीसाठी पुढाकार घेतला. प्रा.राम भोसले या सदस्यांनी गोविंद वरकडे यांना पिठाची गिरणी व मिरची कांडप यंत्र असे २५ हजार रुपयांचे साहित्य व्यवसायासाठी भेट दिले आहेत. या साहित्यातून वरकडे यांनी त्यांचा व्यवसाय उभारुन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, या उद्देशाने ही मदत करण्यात आली. यावेळी कृषीभूषण कांतराव झरीकर, पोलीस पाटील नारायण निरस, प्रा. सुभाष ढगे, बाजीराव निरस, संतोष शिंदे, नागनाथ निरस, सखाराम बोबडे, गणेश भोसले आदींची उपस्थिती होती.