परभणी : ‘नियोजन’चे बस्तान ‘मानव विकास’मध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 01:13 AM2019-01-28T01:13:20+5:302019-01-28T01:13:59+5:30
जिल्हा नियोजन विभागात फर्निचर तयार काम सुरू असल्याने या विभागाच्या समोरच असलेल्या मानव विकास मिशन कार्यालयात नियोजन विभागाचे बस्तान मांडण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या विभागातील जुनी कागदपत्रे समोरच्याच पॅसेजमध्ये ठेवण्यात आली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा नियोजन विभागात फर्निचर तयार काम सुरू असल्याने या विभागाच्या समोरच असलेल्या मानव विकास मिशन कार्यालयात नियोजन विभागाचे बस्तान मांडण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या विभागातील जुनी कागदपत्रे समोरच्याच पॅसेजमध्ये ठेवण्यात आली आहेत. नियोजन विभागात नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने इतर विभागातील अधिकारी, पदाधिकाऱ्यांची मात्र चांगलीच गैरसोय होत आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जिल्हा नियोजन विभागाच्या बळकटीकरणासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. येत्या एक-दोन महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने उपलब्ध झालेल्या निधीतून कामे उरकून घेण्याची घाई सुरू झाली आहे. या घाईतच नियोजन विभागाचे नूतनीकरणाचे काम सुरू केल्याने पदाधिकाºयांची मात्र चांगलीच अडचण झाली आहे. पदाधिकारी कामे घेऊन आल्यास त्यांच्या फाईली लवकर सापडत नाहीत.
या कार्यालयातील सर्वच दफ्तर इतरत्र हलविण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्वच पदाधिकाºयांची कामे मंजूर करुन घेण्यासाठी गडबड सुरू झाली आहे, त्यातच नियोजन विभागाच्या नूतनीकरणाचे काम सुरू केल्याने त्यात अडथळे येत आहे.
जुनी कागदपत्रे उघड्यावरच
जिल्हा नियोजन विभागाच्या कक्षामध्ये नूतनीकरणाचे काम सुरू असल्याने या कक्षातील कागदपत्रेही कक्षाबाहेर काढण्यात आली आहेत़ नियमित वापराची कागदपत्रे मानव विकास विभागाच्या कार्यालयात ठेवली असली तरी मोठ्या प्रमाणात जुन्या फाईली, कागदपत्रांचे गठ्ठे दोन्ही विभागाच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत ठेवण्यात आली आहेत़ ही कागदपत्रे उघड्यावरच ठेवल्याने कागदपत्रांच्या सुरक्षेसंदर्भातही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे़ नियोजन विभागासाठी याच भागात असलेला एक हॉल तात्पुरत्या स्वरुपात देण्यात आला असून, या हॉलमध्ये सर्व कागदपत्रे आणि फाईली हलविण्यासाठी त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे़
दैनंदिन कामावर परिणाम नाही
४नियोजन विभागात वर्ग २ चे तीन अधिकारी आहेत; परंतु या अधिकाºयांसाठी दोनच कक्ष उपलब्ध आहेत. तसेच इतर कर्मचाºयांसाठीही जागा पुरत नव्हती. त्यामुळे नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काम सुरू असून एक ते दीड महिन्यात ते पूर्ण होईल. याच भागात असलेल्या डाटा एन्ट्रीचा हॉल नियोजन विभागासाठी दिला आहे. एक- दोन दिवसांत या हॉलमध्ये स्थलांतर करण्याचे काम पूर्ण होईल. नियमित लागणाºया फाईल आणि इतर कागदपत्रे मानव विकास मिशन कार्यालयात ठेवले असून, बाहेरच्या पॅसेजमध्ये जुने रेकॉर्ड आहे. नूतनीकरणामुळे दैनंदिन कामकाजावर कोणताही परिणाम झाला नाही. यंत्रणांकडून जेवढ्या गतीने कामे येतील, त्याच गतीने त्यांची कामे आम्ही करुत, असे जिल्हा नियोजन अधिकारी अर्जून झाडे यांनी सांगितले.