परभणी : खेळाडूंनी संधीचे सोने करावे-विनोद कांबळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:22 AM2018-11-26T00:22:21+5:302018-11-26T00:23:09+5:30
सीएम चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडूंना संधी प्राप्त झाली असून, अशा क्रीडा स्पर्धांमधूनच ग्रामीण खेळाडूंनी पुढे येऊन देशासाठी खेळावे, असे आवाहन माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी येथे केले़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : सीएम चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामीण खेळाडूंना संधी प्राप्त झाली असून, अशा क्रीडा स्पर्धांमधूनच ग्रामीण खेळाडूंनी पुढे येऊन देशासाठी खेळावे, असे आवाहन माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू विनोद कांबळी यांनी येथे केले़
परभणी येथील जिल्हा स्टेडियम मैदानावर आयोजित केलेल्या सीएम चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन रविवारी विनोद कांबळीे यांच्या हस्ते झाले़ यावेळी भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ़ मीनाताई परतानी, संघटन सरचिटणीस संजय शेळके, शरद पाटील, प्रदीप तांदळे, संजय रिझवाणी, मोहन कुलकर्णी, नगरसेविका मंगलाताई मुदगलकर, सुरेश भुमरे, मधुकर गव्हाणे, सुनील देशमुख, प्रशांत सांगळे आदींची उपस्थिती होती़
जिल्हा स्टेडिमय मैदानावर रविवारपासून या स्पर्धांना सुरुवात झाली आहे़ विनोद कांबळी यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले़ त्यानंतर प्रत्यक्ष मैदानावर जावून विनोद कांबळी यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले़ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा़ सुनील तुरूकमाने यांनी केले़ विनोद कांबळी यांना पाहण्यासाठी क्रीडा रसिकांनी मोठी गर्दी केली होती़
या स्पर्धेमध्ये ८० संघांनी सहभाग घेतला असून, त्यात शहरी आणि ग्रामीण भागातील संघांचाही समावेश आहे़
उद्घाटनीय सामना पार पडल्यानंतर दिवसभरात इतर सामनेही खेळविण्यात आले़ यावेळी क्रीडा प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते़