परभणी पोलिसांची कारवाई; बारा जणांविरुद्ध मोक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 12:06 AM2019-03-31T00:06:18+5:302019-03-31T00:06:43+5:30
येथील संतोष गुजर व इतर ११ जणांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. या कायद्यान्वये आतापर्यंत तीन टोळीविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील संतोष गुजर व इतर ११ जणांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. या कायद्यान्वये आतापर्यंत तीन टोळीविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे.
धुलीवंदनाच्या निमित्ताने शहरात मारहाणीची घटना घडली होती. या प्रकरणी किरणसिंग करमाडसिंग जुन्नी यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन संतोष बापूराव गुजर, सुनील लक्ष्मण शिराळे, रामा बापूराव गुजर, रवि प्रकाशराव गुजर, किरण रामा गुजर, अर्जुन संतोष गुजर, अंबादास रामा गुजर, दीपक प्रकाश गुजर, शेख मतीन शेख शफी, आकाश शेषराव गुजर, भानुदास रामा गुजर आणि मोहन शेषराव गुजर यांच्याविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरुन गुन्हा दाखल झाला होता. संतोष गुजर याची गुन्हेगारी स्वरुपाची पार्श्वभूमी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. संघटित गुन्हेगारी टोळी तयार करुन नवीन सदस्यांना या टोळीत सहभागी करुन घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
तसेच संतोष गुजर याच्याविरुद्ध २० वर्षामध्ये ४७ गुन्हे दाखल आहेत. २०१७ मध्ये टोळी प्रमुख संतोष गुजर व इतर सदस्यांना कलम ५५ अन्वये हद्दपारही केले होते.
दरोडा घालणे, खुनाचा प्रयत्न करणे, विनयभंग, मारहाण, बलात्कार असे गंभीर गुन्हे या टोळीविरुद्ध दाखल असल्याने त्याची दखल घेऊन कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये मोक्का कायद्याचे कलम ३ (१) ३ (२) ३(४) समाविष्ट करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविला होता. त्यास विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मंजुरी दिली आहे.
परभणी जिल्ह्यात गुन्हेगारी टोळ्यांचे उच्चाटन करण्यासाठी मोक्का कायद्यांतर्गत केलेली ही तिसरी कारवाई ठरली आहे. यापूर्वी पूर्णा येथील टोळीप्रमुख सोमनाथ सोलव याच्या टोळीतील २१ आरोपी, चारठाणा येथील टोळीप्रमुख हरिश सुभाष पवार याच्या टोळीतील ८ आरोपींविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून दोन्ही गुन्ह्यातील आरोपी औरंगाबाद येथील हर्सूल कारागृहात आहेत.