परभणी : चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी केले गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 11:34 PM2019-06-11T23:34:05+5:302019-06-11T23:34:46+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील लक्ष्मीपूर पोलीस ठाण्यात चोरी प्रकरणाचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ८ जून रोजी गंगाखेड येथून ताब्यात घेतले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : कोल्हापूर जिल्ह्यातील लक्ष्मीपूर पोलीस ठाण्यात चोरी प्रकरणाचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने ८ जून रोजी गंगाखेड येथून ताब्यात घेतले आहे़
शर्मा ट्रॅव्हल्सने लातूर ते कोल्हापूर प्रवास करीत असताना एका महिलेच्या बॅगमधील २५ तोळे सोने आणि १ लाख ४९ हजार रुपये चोरल्या प्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता़ या प्रकरणात खुशाल सोमनाथ पवार (रा़ कमलापूर ता़ पूर्णा) याने चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले़ कोल्हापूर पोलिसांनी अनेक वेळा परभणी जिल्ह्यात या आरोपीचा शोध घेतला़ परंतु, तो हाती लागला नाही़ खुशाल पवार याने बीड जिल्ह्यातही अनेक गुन्हे केले असल्याने बीड पोलीसही त्याच्या शोध घेत होते़ दरम्यान, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी या आरोपीची माहिती घेतली़ तेव्हा हा आरोपी गंगाखेड येथे येणार असल्याचे स्पष्ट झाले़ त्यावरून ८ जून रोजी स्थागुशाचे पथक गंगाखेड येथे रवाना करण्यात आले़ गंगाखेड बसस्थानकावर पहाटेपासूनच सापळा लावण्यात आला़ दरम्यान, खुशाल सोमनाथ पवार यास पथकाने ताब्यात घेतले़ त्याच्याकडे गुन्ह्याची विचारपूस केली असता, त्याने कबुली दिली आहे़ या आरोपीस पुढील तपास कामी लक्ष्मीपूर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे़ ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील गोपीनवार, प्रकाश कापुरे, उद्धव सातपुते, शंभूदेव राख, लक्ष्मीकांत धृतराज, सुरेश डोंगरे, किशोर चव्हाण, सय्यद मोबीन, सय्यद मोईन, संजय घुगे, राजेश आगासे, दिलावर पठाण, राम घुले यांनी केली़