परभणी : पोलिसांनी जुळविले विस्कटलेले संसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:31 AM2018-07-16T00:31:19+5:302018-07-16T00:33:48+5:30
दैनंदिन जीवनात छोट्या-मोठ्या कुरबुरीतून पती-पत्नींमध्ये दुरावा निर्माण होऊन विस्कटण्याच्या मार्गावर असलेले ७० संसार पुन्हा जुळवण्याची कामगिरी जिल्हा पोलीस दलातील महिला तक्रार निवारण केंद्राने केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दैनंदिन जीवनात छोट्या-मोठ्या कुरबुरीतून पती-पत्नींमध्ये दुरावा निर्माण होऊन विस्कटण्याच्या मार्गावर असलेले ७० संसार पुन्हा जुळवण्याची कामगिरी जिल्हा पोलीस दलातील महिला तक्रार निवारण केंद्राने केली आहे.
पती-पत्नींमध्ये झालेल्या वादातून अथवा अन्य कारणांवरुन वाद निर्माण होऊन सासरच्या मंडळीविरुद्ध महिलांच्या तक्रारी दाखल होतात. यातून अनेक वर्षापासून सुरु असलेला सुखी संसार मोडतो. जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांमध्ये दररोज अशा प्रकारच्या तक्रारी दाखल होतात. या प्रकरणांमध्ये थेट गुन्हा दाखल करणे हा पर्याय नसून त्यात सामोचारानेही मार्ग काढता येऊ शकतो, या भावनेने पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा महिला तक्रार निवारण केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.
पोलीस ठाण्यांमध्ये अशा प्रकारची तक्रार देण्यासाठी आलेल्या महिलांना प्रारंभी महिला तक्रार निवारण केंद्रात पाठविले जाते. या केंद्रातील अधिकारी व कर्मचारी महिलेच्या तक्रारीतील तथ्य जाणून घेतात. त्यानंतर या प्रकरणात तडजोड करण्याचे प्रयत्न केले जातात. दोन्ही पक्षकारांना समोर बसवून त्यांच्यात समेट घडवून आणला जातो. यातून अनेक वेळा तक्रारकर्त्यांच्या शंकांचे निरसण होऊन संसार पुन्हा सुरळीत होतो.
१ जानेवारी ते १४ जुलैपर्यंत महिला तक्रार निवारण केंद्रात दाखल झालेल्या प्रकरणांपैकी ७० प्रकरणांमध्ये यशस्वी तडजोड करण्यात पोलीस प्रशासनाला यश आले आहे. या ७० ही प्रकरणातील पती-पत्नी आता गुण्यागोविंदाने नांदत आहेत. त्यामुळे ७ महिन्यांच्या काळात विस्कटलेले ७० संसार पुन्हा जुळविण्याची कामगिरी या केंद्राने केली आहे.
महिला तक्रार निवारण केंद्राच्या पोलीस उपनिरीक्षक गोपी सोनेत, पोलीस नाईक उमा पाटील, शकुंतला एकाडे, अर्चना रेड्डी, सीमा चाटे, आम्रपाली मुजमुले या कर्मचाऱ्यांनी यासाठी प्रयत्न केले.
पीडित महिलांनी पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करण्यापूर्वी जिल्हा पोलीस दलातील महिला तक्रार निवारण केंद्राशी संपर्क साधावा. गुन्हा दाखल करण्यापेक्षा सामोपचारातून प्रकरण मिटवून घ्यावे, असे आवाहन महिला तक्रार निवारण केंद्राने केले आहे.