परभणी : चारठाण्यातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 01:01 AM2019-02-13T01:01:36+5:302019-02-13T01:02:26+5:30
चारठाणा गावात सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर सोमवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून रोख ६ हजार ६८० रुपये आणि तीन मोटारसायकल, चार मोबाईल असा २ लाख १४ हजार ८० रुपयांचा ऐवज जप्त केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : चारठाणा गावात सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर सोमवारी रात्री पोलिसांनी छापा टाकून रोख ६ हजार ६८० रुपये आणि तीन मोटारसायकल, चार मोबाईल असा २ लाख १४ हजार ८० रुपयांचा ऐवज जप्त केला.
जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्याविरुद्ध पोलिसांनी धाडसत्र सुरु केले आहे. या अंतर्गत चारठाणा गावात जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सोमवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी दीपक ऊर्फ बाळू भानूदास क्षीरसागर, अजय प्रभाकर देशमुख आणि शंकर गोपीचंद राठोड (रा.चारठाणा) हे जुगार खेळत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी आरोपींकडून रोख ६ हजार ६८० रुपये, तीन मोटारसायकल आणि जुगाराचे आकडे टाईप करण्यासाठी ठेवलेले चार मोबाईल असा २ लाख १४ हजार ८० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक एच.जी. पांचाळ, हेकॉ. हनुमान कच्छवे, सखाराम टेकुळे, जगदीश रेड्डी, घनसावंत, कोल्हे, कांदे, मुंडे, पुजा भोरगे यांनी केली.
ढाब्यावर पकडली दारु
परभणी- त्रिधारा ते झिरोफाटा या रस्त्यावरील दोस्ती ढाब्यावर छापा टाकून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने २ हजार ८०० रुपयांची देशी, विदेशी दारु पकडली आहे. ताडकळस पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या या ढाब्यावर अवैधरित्या दारु विक्री होत असल्याची माहिती स्थागुशाच्या पथकाला मिळाली. त्यावरुन ११ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा ढाब्यावर छापा टाकण्यात आला. यावेळी राहटी येथील एका आरोपी महिलेसह ढाबा मालक दादाराव बागल (रा.उखळद) यांच्याविरुद्ध ताडकळस पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे. या छाप्यात देशीदारुच्या ४८ बाटल्या आणि विदेशी दारुच्या ५ बाटल्या जप्त करण्यात आल्या. स्थागुशाचे मधुकर चट्टे, बाळासाहेब तुपसुंदरे, आशा शेल्हाळे, भगवान भुसारे, हरि खुपसे, परमेश्वर शिंदे, संजय शेळके यांनी ही कारवाई केली.