परभणी : मटका बुकीवर पोलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 12:16 AM2018-12-22T00:16:15+5:302018-12-22T00:17:03+5:30
तालुक्यातील पेडगाव येथील बसस्थानक परिसरात सुरु असलेल्या मटक्याच्या बुकीवर सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप सिंह गील यांच्या पथकाने छापा टाकून १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : तालुक्यातील पेडगाव येथील बसस्थानक परिसरात सुरु असलेल्या मटक्याच्या बुकीवर सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप सिंह गील यांच्या पथकाने छापा टाकून १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास करण्यात आली.
परभणी शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून मटक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शहरातील विविध भागात सर्रासपणे मटका सुरु असताना पोलिसांकडून मुख्य बुकीवर कारवाई होण्याऐवजी पंटरवरच कारवाई केली जात आहे. शिवाय या कारवाईत फारसा मुद्देमालही पोलिसांच्या हाती लागत नसल्याचे आतापर्यंतच्या कारवाईवरुन स्पष्ट झाले आहे. आठवडाभरापूर्वी परभणी शहरात सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप सिंह गील यांच्या पथकाने दोन ठिकाणी केलेल्या कारवाई मटका खेळणाऱ्या दोघांकडून एकूण १२० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले होते. त्यानंतर २० डिसेंबर रोजी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलीस अधीक्षक संदीप सिंह गील यांच्या पथकाने परभणी तालुक्यातील पेडगाव येथील बसस्थानकाजवळ सापळा रचून मटकाचालकांवर छापा टाकला. त्यात लिंबाजी पांडुरंग पवार, राजू पिराजी कटारे व बबन शामराव आळसे हे पळून जात असताना त्यांना पाठलाग करुन ताब्यात घेण्यात आले व त्यांची चौकशी केली असता ते लोकांना जमवून त्यांच्याकडून पैसे घेऊन मुंबई नावाचा मटका जुगार खेळत असल्याचे आढळून आले. यावेळी त्यांच्याकडून १३ हजार ६९३ रुपये व मटका जुगाराचे साहित्य, दोन मोबाईल असा एकूण १५ हजार १९३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी लक्ष घालून मुख्य बुकींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.