वडिलांच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या विदेशी युवकाच्या मदतीला धावले परभणी पोलीस; तत्परतेने मिळवून दिली प्रमाणपत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 07:23 PM2018-01-15T19:23:27+5:302018-01-15T19:25:30+5:30
वडिलांच्या निधनामुळे अंत्यविधीसाठी निघालेल्या विदेशी युवकाला परवानगी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सुटी व संक्रांतीचा सण बाजूला सारुन पोलिसांनी दिवसभर प्रयत्न केले. अखेर सायंकाळी ५ वाजता परतीचे परवानगी प्रमाणपत्र मिळाल्याने या युवकाचा आपल्या घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
परभणी : वडिलांच्या निधनामुळे अंत्यविधीसाठी निघालेल्या विदेशी युवकाला परवानगी प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सुटी व संक्रांतीचा सण बाजूला सारुन पोलिसांनी दिवसभर प्रयत्न केले. अखेर सायंकाळी ५ वाजता परतीचे परवानगी प्रमाणपत्र मिळाल्याने या युवकाचा आपल्या घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
अफगाणिस्तानातील काबुल येथील महंमद नासेर बजुनी हा परभणी येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात पदवीचे शिक्षण घेत आहे. येथील आंतराष्ट्रीय वसतिगृहात तो वास्तव्याला आहे. १४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता काबुल येथे त्याच्या वडिलांचे अपघाती निधन झाले. ही दु:खद वार्ता दुपारी महमद नासेर याला समजली. त्यानंतर त्याने विद्यापीठ प्रशासनाकडे सुटीचा अर्ज केला.
विद्यापीठ प्रशासनानेही पोलीस प्रशासनाला ही माहिती दिली. १४ जानेवारी रोजी रविवार आणि मकरसंक्रातीचा सण असल्याने या विदेशी विद्यार्थ्यास त्याच्या मायदेशी परतण्यासाठी परवानगी पत्र देणे अवघड काम होते. तरीही विद्यापीठाचे आर.व्ही. चव्हाण हे या विद्यार्थ्याला घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहचले. मात्र येथील पारपत्र, परकीय नोंदणी कक्ष बंद होता.
विद्यार्थ्याचे दु:ख व त्याची घरी परतण्याची गरज लक्षात घेऊन संबंधित अधिकार्याला तातडीने बोलाविण्यात आले. पोलीस नाईक आशा पंडितराव सावंत यांनी सण बाजुला सारुन कार्यालय गाठले. तसेच सहकारी कर्मचारी मोहनसिंग लाड यांनाही बोलावून घेतले. दोघांनी या विद्यार्थ्याच्या परतीच्या परवानगीचे अर्ज तयार करुन आॅनलाईन दाखल केले. या अर्जांवर जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक बी.एल. देशमुख यांच्यासह पोलीस अधीक्षक दिलीप झळके यांच्या घरी जावून त्यांचीही स्वाक्षरी घेण्यात आली. या सर्व प्रक्रियेत सायंकाळी ५ वाजेपर्यंत विद्यार्थ्याच्या परवानगीचा अर्ज पूर्ण झाला आणि त्यामुळे गावी जाण्याचा त्याचा मार्ग मोकळा झाला. सायंकाळी नंदीग्राम एक्सप्रेसने हा विद्यार्थी मुंबईकडे रवाना झाला आहे. मुंबईहून तो दिल्लीला जाणार असून, दिल्ली येथून विमानाने तो काबुलला जाणार आहे. पोलीस प्रशासनाने दाखविलेल्या माणुसकीमुळे महंमद नासेर याला सोमवारी सायंकाळपर्यंत काबुल पोहचून आपल्या वडिलांच्या अंत्यविधीसाठी पोहचता येणार आहे.