परभणी : पोलिसांनी जप्त केला ७८ लाखांचा ऐवज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 12:05 AM2019-06-11T00:05:12+5:302019-06-11T00:05:30+5:30
जिंतूर तालुक्यात ब्रेकर, जेसीबी मशीन चोरी प्रकरणामध्ये स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ७८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिंतूर तालुक्यात ब्रेकर, जेसीबी मशीन चोरी प्रकरणामध्ये स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून ७८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे़
जिंतूर येथील गजानन घुगे यांच्या फिर्यादीनुसार ४ मे रोजी २ लाख रुपये किंमतीचे जेसीबी यंत्र व टेलकॉम कंपनीचे ब्रेकर चोरून नेल्याची तक्रार जिंतूर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती़ त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला़
या प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने सायबर सेलच्या माध्यमातून सीसीटीव्ही फुटेज एकत्र केले, त्यात हे ब्रेकर पोकलॅन मशीन व ट्रेलर्सच्या सहाय्याने चोरून नेल्याचे निष्पन्न झाले़ सायबर सेलच्या मदतीने फुटेज व वाहनांच्या क्रमांकाची माहिती घेतली़ तीन दिवसांच्या प्रयत्नानंतर अमर अजित बोरकर (रा़ चौंडेश्वर वाडी ता़ माळसिरस) या आरोपीस सोलापूर येथून ताब्यात घेण्यात आले तर याच प्रकरणातील नवनाथ बाबूराव शेळके (रा़ नांदगाव ता़ चाकूर) यास त्याच्या गावातून पोलिसांनी ताब्यात घेतले़ आरोपी अमर बोरकर याने त्याचे वडील अजित बोरकर व नवनाथ शेळके यांच्या मदतीने चोरी केल्याचे सांगितले़
या गुन्ह्यात २ लाख रुपयांचे ब्रेकर, गुन्हा करण्यासाठी वापरलेले ५० लाख रुपये किंमतीचे पोकलॅन मशीन, २० लाख रुपयांचे ट्रेलर आणि ६ लाख रुपयांची हुंडाई कार असा ७८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ आरोपींना जिंतूर पोलीस ठाण्यात हजर केल्याची माहिती स्थागुशाने दिली़
ही कारवाई पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अप्पर पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील गोपीनवार, प्रकाश कापुरे, सुग्रीव केंद्रे, निलेश भुजबळ, गणेश कौटकर, जमीर फारुखी, शंकर गायकवाड, अरुण कांबळे, राजेश आगासे यांनी केली़