परभणी : जप्त वाहनांमुळे पोलीस ठाणे फुल्ल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 11:23 PM2020-04-12T23:23:20+5:302020-04-12T23:24:07+5:30

संचारबंदीच्या काळात पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या वाहनांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली असून, या काळात जप्त केलेली वाहने त्या त्या पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत़ सद्यस्थितीला शहरातील चारही पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सुमारे १७५ वाहने पोलीस ठाण्यामध्ये जमा केली आहेत़ परिणामी ठाण्यांचा परिसर वाहनांमुळे फुल्ल झाला आहे़

Parbhani: Police station full of seized vehicles | परभणी : जप्त वाहनांमुळे पोलीस ठाणे फुल्ल

परभणी : जप्त वाहनांमुळे पोलीस ठाणे फुल्ल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : संचारबंदीच्या काळात पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या वाहनांविरुद्ध कारवाईची मोहीम हाती घेतली असून, या काळात जप्त केलेली वाहने त्या त्या पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत़ सद्यस्थितीला शहरातील चारही पोलीस ठाण्याच्या अंतर्गत सुमारे १७५ वाहने पोलीस ठाण्यामध्ये जमा केली आहेत़ परिणामी ठाण्यांचा परिसर वाहनांमुळे फुल्ल झाला आहे़
कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे़ सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले असून, नागरिकांना घराबाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे़ असे असतानाही छोट्या मोठ्या कामांचे निमित्त काढून नागरिक शहरातील रस्त्यांवर फिरत असल्याचे पोलीस प्रशासनाने ८ दिवसांपासून कडक पावले उचलली आहेत़ सकाळी ७ ते १० हा वेळ अत्यावश्यक साहित्याच्या खरेदीसाठी देण्यात आला आहे़ त्यानंतर मात्र शहरातील रस्त्या-रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे़
प्रत्येक वाहनांची तपासणी केली जात असून, त्यात अत्यावश्यक कामा व्यतिरिक्त फिरत असणाºया नागरिकांवर थेट कारवाई केली जात आहे़ वाहनधारकांचे ओळखपत्र तपासून त्यांचा वाहन क्रमांक नोंद करून घेतला जात आहे़ या प्रकारामुळे नागरिकांत आता धास्ती निर्माण झाली आहे़ पोलिसांनी नागरिकांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबरोबरच वाहन जप्त करण्याची कारवाई सुरू केली आहे़ दररोज दिवसभरात प्रत्येक पोलीस ठाण्याच्या अंतर्गत ४ ते ५ वाहने जप्त केली जात आहेत़ ८ दिवसांच्या या काळात सुमारे १७५ वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत़ त्यात चार चाकी, आॅटोरिक्षा आणि दुचाकी वाहनांचा समावेश आहे़
विशेष म्हणजे जप्त केलेल्या वाहनांमध्ये सर्वाधिक दुचाकी वाहने आहेत़ जप्त केलेली वाहने त्या त्या पोलीस ठाण्यामध्ये लावली जात आहेत़ त्यामुळे पोलीस ठाण्यांचा परिसर जप्त वाहनांनी व्यापून गेला आहे़ दररोज जप्त वाहनांची संख्या वाढत आहे़ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी घरात थांबणे हा एकमेव प्रभावी उपाय आहे़; परंतु, नागरिक त्यास गांभिर्याने घेत नाहीत़ नागरिकांच्या आरोग्यासाठीच शासन आणि प्रशासनाने संचारबंदीची सुरुवात केली आहे़ मात्र अनेकांना संचारबंदीचे गांभीर्य नसल्याने आदेश धुडकावून छोट्या छोट्या कामांसाठीही घराबाहेर पडण्याचे प्रकार घडत आहेत़
विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांचा जमावबंदी कायदा, केंद्र शासनाचा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा यासारखे गंभीर लागू असतानाही नागरिक मात्र फारसे गांभिर्याने घेत नसल्याने पोलिसांना कारवाईचे हत्यार उपसावे लागत आहे़ शहराच्या विविध भागांत नाकाबंदी करून ही कारवाई केली जात आहे़ नागरिकांच्या आरोग्यासाठीच पोलीस यंत्रणा घरदार सोडून रस्त्यांवर उभे राहून आणि प्रसंगी स्वत:चा जीव धोक्यात घालून उपाययोजना करीत आहेत़ असे असताना काही नागरिक अनावश्यक घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करावे, अनावश्यक घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
एकाच दिवशी २० गाड्या पकडल्या
४नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पोलीस कर्मचाºयांनी विनाकारण फिरणाºया २० गाड्या ११ एप्रिल रोजी जप्त केल्या आहेत़ त्यामध्ये एमएच २२ एएल-८१३९, एमएच २२ एजे-२१८३, एमएच ३८ आर ७७५, एमएच २२ एसी- ५८५, एमएच २२ एसी-५५५८, एमएच २२ एएस- ७९५४ आणि एक विना नंबरची दुचाकी जप्त करण्यात आली़ या व्यतिरिक्त १३ वाहने नवा मोंढा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक रामेश्वर तट यांनी दिली़
नाकाबंदीत जप्त केली वाहने
ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कर्मचाºयांनी ११ एप्रिल रोजी पाथरी रोडवरील पेट्रोल पंप परिसरात नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली़ यात ८ वाहने जप्त केली आहेत़ त्यामध्ये ५ मोटारसायकल, एक कार आणि दोन मालवाहू वाहनांचा समावेश आहे़
नानलपेठ पोलीस ठाण्यात १०० हून अधिक वाहने
४शहरात ४ पोलीस ठाण्यांची हद्द येते. त्यात नानलपेठ पोलीस ठाण्याने सर्वाधिक १०० पेक्षा अधिक दुचाकी, चारचाकी वाहने जप्त केली आहेत़ ही वाहने पोलीस ठाण्याच्या आवारातच लावली असून, आता वाहने उभी करण्यासाठी जागाही शिल्लक राहिली नाही़ कोतवाली पोलीस ठाण्यात २१ दुचाकी, ३ आॅटोरिक्षा आणि दोन चारचाकी वाहने जप्त केली आहेत़ नवा मोंढा पोलीस ठाण्यात आतापर्यंत २४ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत़ कोतवाली पोलीस ठाण्यातील जप्त केलेल्या वाहनांची संख्याही दोन आकडी आहे़ त्यामुळे चारही पोलीस ठाण्यांचा परिसर वाहनांनी फुल्ल झाला आहे़

Web Title: Parbhani: Police station full of seized vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.