परभणी : वाळूमाफियांच्या टोळीला पोलीस अधीक्षकांनी केले हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 12:40 AM2019-08-08T00:40:04+5:302019-08-08T00:40:28+5:30
वाळुची तस्करी करीत असताना महसूल आणि पोलीस प्रशासनावर हल्ला करणाऱ्या वाळूमाफियांच्या टोळीतील टोळी प्रमुखासह सात जणांना परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी काढले असून, या वाळूमाफियांना हद्दपार करण्यात आले आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : वाळुची तस्करी करीत असताना महसूल आणि पोलीस प्रशासनावर हल्ला करणाऱ्या वाळूमाफियांच्या टोळीतील टोळी प्रमुखासह सात जणांना परभणी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी काढले असून, या वाळूमाफियांना हद्दपार करण्यात आले आहे़
१५ सप्टेंबर २०१८ रोजी बामणी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांचे कर्मचाऱ्यांनी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त केल्यानंतर या टोळीने त्यांच्यावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला़ त्यात सहायक पोलीस निरीक्षक व काही कर्मचारी जखमी झाले होते़ या प्रकरणी वाळूमाफियांविरूद्ध बामणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता़ या गुन्ह्यातील आरोपी भगवान सखाराम मते, गजानन फकीरा मानकरी, अशोक गोरख मते, गजानन वामन वटाणे, सखाराम किशन मते, अशोक मोहन रेवाळे, मनोहर मदन रेवाळे, सुनील महादू वटाणे, मोहसीन फेरोज बेग आणि ज्ञानेश्वर प्रल्हाद खुपसे यांच्या टोळीच्या गुन्ह्यांची अभिलेख पडताळणी केली असता, विविध प्रकारचे गुन्हे त्यांच्यावर दाखल असल्याचे स्पष्ट झाले़ त्यामुळे या टोळीविरूद्ध हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता़ पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी २७ जून २०१९ रोजी सुनावणी घेतली़ त्यात टोळीप्रमुख भगवान मते, टोळी सदस्य गजानन फकीरा मानकरी, आकाश गोरख मते, गजानन वामन वटाणे, ज्ञानेश्वर प्रल्हाद खुपसे यांना एक वर्षाच्या कालावधीसाठी तर अशोक मनोहर रेवाळे, मनोहर मदन रेवाळे, मोहसीन बेग फेरोज बेग यांना ९ महिन्यांसाठी परभणी जिल्ह्यातील परभणी, सेलू, पाथरी, जिंतूर तालुक्यालगत असलेल्या जालना जिल्ह्यातील मंठा, परतूर, आष्टी, बुलडाणा जिल्ह्यातील लोणार, हिंगोली जिल्ह्यातील औंढा, सेनगाव, वसमत या तालुक्यातून हद्दपार करण्याचे आदेश जारी केले़
त्यानुसार ३ आॅगस्ट रोजी बामणी पोलिसांनी या आरोपींना प्रतिबंधित क्षेत्रातून हद्दपार करण्याची कारवाई केली आहे़