परभणी ;आत्मदहनाच्या प्रयत्नातील शेतकऱ्यांना घेतले ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 12:40 AM2018-06-02T00:40:25+5:302018-06-02T00:40:25+5:30
निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव मावेजा देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी माजलगाव कालवा विभाग क्रमांक १० कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्यासाठी आलेल्या ७६ शेतकºयांना नवा मोंढा पोलिसांनी जायकवाडी परिसरातील गेटवरच ताब्यात घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी संपादित केलेल्या जमिनीचा वाढीव मावेजा देण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवारी माजलगाव कालवा विभाग क्रमांक १० कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्यासाठी आलेल्या ७६ शेतकºयांना नवा मोंढा पोलिसांनी जायकवाडी परिसरातील गेटवरच ताब्यात घेतले.
परभणी तालुक्यातील संबर व पिंपळगाव टोंग या गावांतील ७६ शेतकºयांनी या संदर्भात जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ७६ शेतकºयांच्या जमिनी निम्न दुधना प्रकल्पाच्या डाव्या कालव्यासाठी खाजगी वाटाघाटीने २७ जून २०१४ ते २७ जुलै २०१५ या दरम्यान खरेदी करुन संपादित केल्या होत्या. या जमिनीचा मोबदला भूसंपादन कायदा २०१३ प्रमाणे देण्यात यावा, यासाठी वर्षभरापासून या शेतकºयांनी शासन दरबारी निवेदने दिली आहेत; परंतु, याबाबत कारवाई झाली नसल्याने संबर व पिंपळगाव टोंग या गावातील ७६ शेतकºयांनी १ जून रोजी जायकवाडी प्रकल्प कार्यालय किंवा जिल्हा कचेरी परिसरात आत्मदहनाचा इशारा दिला होता.
त्यामुळे शुक्रवारी सकाळपासूनच पोलीस प्रशासनाने जायकवाडी परिसरातील माजलगाव कालवा विभाग क्रमांक १० च्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला होता. शिवाय आत्मदहनाचा इशारा देणाºया शेतकºयांचा पोलीस शोध घेत होते. सकाळी ११ वाजेच्या सुमारास गंगाधर चव्हाण, सुदाम झाडे, कुंडलिक चव्हाण, रंगनाथ काळे, बालाजी पवार, प्रकाश टोंग यांच्यासह ७६ शेतकरी हातामध्ये पेट्रोलच्या कॅन, कीटक नाशक औषधी घेऊन जायकवाडी वसाहतीकडे निघाले. हे शेतकरी जायकवाडी वसाहतीतील समाजकल्याण विभागाच्या गेट जवळ आले असता नवा मोंढा पोलिसांनी त्यांना अडविले व त्यांच्याकडून पेट्रोलची कॅन, कीटकनाशके व अन्य साहित्य जप्त करुन त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना नवा मोंढा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर येथे त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करुन त्यांना काही वेळानंतर सोडून देण्यात आले.
संबर येथील शेतकºयांच्या जमिनीचे खरेदीखत २०१३-१४ या वर्षात तर पिंपळगाव टोंग येथील शेतकºयांच्या जमिनीचे खरेदीखत २०१४ मध्ये झाले आहेत. खाजगी वाटाघाटीद्वारे संबंधितांना जमिनीचा मोबदला देण्यात आला आहे. १२ मे २०१५ च्या शासन निर्णयानुसार जमिनीचा वाढीव मोबदला देण्यात यावा, अशी या शेतकºयांची मागणी आहे; परंतु, २०१५ चा निर्णय होण्यापूर्वीच या शेतकºयांच्या जमिनीच्या खरेदीखताचे व्यवहार पूर्ण झाले आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांची मागणी मान्य करणे शक्य नाही. या संदर्भात बैठक घेऊन व पत्राद्वारे त्यांना प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
-डॉ.संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी भूसंपादन