परभणी : कनेक्टीव्हिटीअभावी रेल्वेची टपाल सेवा कोलमडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 10:58 PM2019-05-04T22:58:52+5:302019-05-04T22:59:04+5:30
येथील रेल्वेस्थानकावरून होणारी टपालांची आवक-जावक कनेक्टीव्हीटी मिळत नसल्याने महिनाभरापासून ठप्प पडली आहे़ परिणामी नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील रेल्वेस्थानकावरून होणारी टपालांची आवक-जावक कनेक्टीव्हीटी मिळत नसल्याने महिनाभरापासून ठप्प पडली आहे़ परिणामी नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे़
रेल्वे विभागाच्या वतीने रेल्वे टपाल सेवा चालविली जाते़ या माध्यमातून जिल्ह्यातील महत्त्वाचे टपाल पोहचती करण्याचे काम केले जाते़ रजिस्ट्री, स्पीड पोस्ट तसेच इतर टपाल सेवा या कार्यालयातून दिली जात आहे़ भुसावळ येथील कार्यालयांतर्गत चालणाऱ्या परभणी येथील टपाल कार्यालयाला सीफी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आॅनलाईन नेटवर्क उपलब्ध करून देण्यात आले आहे़ मात्र मागील महिनाभरापासून कनेक्टीव्हीटी मिळत नसल्याने टपाल सेवा खोळंबली आहे़ रजिस्ट्री, स्पीड पोस्ट यासारखी टपाल सेवा आॅनलाईन पद्धतीने चालविली जाते; परंतु, नेटवर्क मिळत नसल्याने येथील कामकाज ठप्प पडले आहे़
परभणी येथील टपाल कार्यालयातून दररोज सुमारे १०० टपालांची आॅनलाईन नोंदणी करून दिली जाते़ परंतु, मागील एक महिन्यापासून ही सेवा ठप्प पडली आहे़ या संदर्भात परभणी कार्यालयातून भुसावळ येथील विभागीय टपाल कार्यालयाकडे अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला आहे़ मात्र अद्यापपर्यंत ठोस उपाय केले नसल्याने नेटवर्कची समस्या भेडसावत आहे़ आॅनलाईन टपाल पाठवित असताना नेटवर्क मिळणे आवश्यक आहे़; परंतु, हे नेटवर्क मिळत नसल्याने या कार्यालयातील टपाल सेवा ठप्प पडली आहे़
इतर टपाल सेवेच्या तुलनेत रेल्वेची टपाल सेवा जलद असल्याने नागरिक मोठ्या संख्येन या सेवेचा वापर करतात़ महत्त्वाचे टपाल रेल्वेच्या टपाल सेवेमार्फतच पाठविले जातात; परंतु, महिनाभरापासून नेटवर्क अभावी टपाल सेवा ठप्प असल्याने नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे़
दररोज सुमारे १०० टपालांची आवक
येथील रेल्वे टपाल सेवेच्या माध्यमातून दररोज साधारणत: १०० टपालांची आवक होते़ त्यात ३० ते ४० रजिस्ट्री टपाल आणि ५० ते ६० स्पीड पोस्टचा समावेश आहे़ या माध्यमातून दिवसाकाठी साधारणत: २ हजार ५०० रुपयांपर्यंतचा महसूल प्राप्त होतो़ महिनाभरापासून ही टपालसेवा बंद असल्याने येथील टपाल कार्यालयाच्या सुमारे ६ लाख २५ हजार रुपयांचा महसल बुडाला आहे़
रेल्वेच्या टपाल सेवेच्या माध्यमातून आॅनलाईन जलद गतीने टपाल पोहचते केले जातात़ त्यामुळे रेल्वे विभागाची टपालसेवा वापरणाºया ग्राहकांची संख्या अधिक आहे़ प्रत्येक तीन महिन्याला या टपाल कार्यालयास पासवर्ड दिला जातो़ तीन महिन्यांची मुदत संपण्यापूर्वीच या कार्यालयातून पासवर्ड मागणी करण्यात आली होती़ टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसने हा पासवर्डही उपलब्ध करून दिला; परंतु, नेटवर्क मिळत नसल्याने फाईल तयार होत नाहीत़ परिणामी नवीन बुकींग ठप्प पडली आहे़
टपाल कार्यालयात नवीन बुकींग बंद असली तरी बाहेरगावाहून येणारे टपाल वितरित करण्याचे काम सुरू आहे़ त्यावर कुठलाही परिणाम झाला नाही़ त्याचप्रमाणे किरकोळ टपाल आॅर्डरही स्वीकारल्या जातात़ केवळ आॅनलाईनची कामे ठप्प आहेत़ मात्र मागील काही वर्षांपासून आॅनलाईन टपाल पाठविणाºया ग्राहकांचीच संख्या अधिक असल्याने ग्राहकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे़ येथील टपाल सेवा तत्काळ पूर्ववत करावी, अशी मागणी होत आहे़