परभणी : ७ पं़स़वर महाविकास आघाडीची सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 12:16 AM2019-12-28T00:16:20+5:302019-12-28T00:16:33+5:30
राज्यात सत्तेत आलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या महाविकास आघाडीचा प्रयोग परभणी जिल्ह्यातही पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणुकीत यशस्वी झाला असून, या आघाडीने ९ पैकी ७ पं़स़ ताब्यात घेतल्या आहेत़ गंगाखेडमध्ये मात्र रासपने शिवसेना व राष्ट्रवादीचे सदस्य फोडत सत्ता कायम राखली आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : राज्यात सत्तेत आलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या महाविकास आघाडीचा प्रयोग परभणी जिल्ह्यातही पंचायत समिती सभापती, उपसभापती निवडणुकीत यशस्वी झाला असून, या आघाडीने ९ पैकी ७ पं़स़ ताब्यात घेतल्या आहेत़ गंगाखेडमध्ये मात्र रासपने शिवसेना व राष्ट्रवादीचे सदस्य फोडत सत्ता कायम राखली आहे़
परभणी पंचायत समितीमध्ये यापूर्वी काँग्रेस-भाजपाची सत्ता होती़ अडीच वर्षापूर्वी शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने भाजपाला उपसभापतीपद देवून पं़स़ ताब्यात ठेवली होती़ या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने शांत राहण्याची भूमिका घेत अप्रत्यरित्या शिवसेनेला सहकार्य करीत महाविकास आघाडीच्या प्रयोगाला साथ दिली़ शिवाय भाजपाचा एक सदस्य आपल्या गोटात घेत शिवसेनेने धक्कातंत्राचा अवलंब केला़ त्यामुळे सभापती व उपसभापती हे दोन्ही पदे शिवसेनेने आपल्याकडे कायम ठेवली़ त्यामुळे येथील पं़स़च्या सत्तेतून भाजपा बाहेर फेकली गेली़
पूर्णा पंचायत समितीत यापूर्वी राष्ट्रवादी- भाजपाची सत्ता होती़ यावेळी राष्ट्रवादीने भाजपाला सत्तेबाहेर काढून शिवसेनेला सोबत घेतले व सभापतीपद स्वत:कडे ठेवत सेनेला उपसभापतीपद दिले़ मानवत पंचायत समितीत शिवसेनेतील गटबाजी पुन्हा एकदा दिसून आली़ येथे शिवसेनेने काँग्रेसच्या सदस्यांना सोबत घेत सभापती, उपसभापती ही दोन्ही पदे ताब्यात घेतली़ गंगाखेड पंचायत समितीमध्ये मात्र बऱ्याच घडामोडी दिसून आल्या़ या पंचायत समितीमध्ये यापूर्वी रासप-भाजपा-शिवसेनेची सत्ता होती़ यावेळी येथे महाविकास आघाडीचा प्रयोग करून भाजपा व रासपला सत्तेबाहेर ठेवण्याचा राष्ट्रवादीने केलेला प्रयत्न फोल ठरला़ येथे रासपने राष्ट्रवादी व शिवसेनेचे प्रत्येकी दोन सदस्य फोडून पं़स़तील सत्ता कायम ठेवली़ दुसरीकडे राष्ट्रवादीचे गटनेते शिवाजीराव मुठाळ यांनी पक्षाच्या ५ सदस्यांच्या नावे सभापतीपदासाठी महानंदा जाधव व उपसभापतीपदासाठी जानकीराम पवार यांना मतदान करण्याचा व्हीप काढूनही त्याला दोन बंडखोर सदस्यांनी दाद दिली नाही व त्यांनी उघडपणे रासपला मदत केली़ त्यामुळे येथे सभापतीपद रासपकडे तर उपसभापतीपद शिवसेनेच्या बंडखोर सदस्याला मिळाले़
पालम पंचायत समितीत घनदाट मित्र मंडळाने अडीच वर्षापूर्वी राष्ट्रवादीला सोबत घेत सत्ता मिळविली होती़ यावेळी घनदाट मित्र मंडळाने भाजपाला सत्तेत घेत राष्ट्रवादीला सत्ताबाहेर काढले़ विधानसभा निवडणुकीतील घडामोडी यास जबाबदार असल्याचे समजते़ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी घनदाट मित्र मंडळावर विश्वासघात केल्याचा आरोप केला असला तरी या मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्याला दाद दिलेली नाही़
दोन पं़स़त भाजपा सत्तेबाहेर; काँग्रेसनेही एक ठिकाणची सत्ता गमावली
४भारतीय जनता पार्टी यापूर्वी पूर्णा व परभणी पंचायत समितीत सत्तेत होती़ दोन्ही ठिकाणी या पक्षाला उपसभापतीपद मिळाले होते़ पुर्णेत राष्ट्रवादीने शिवसेनेला सोबत घेत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी केला तर परभणीत शिवसेनेने एकहाती सत्ता मिळवित भाजपाला एकाकी पाडले़ त्यामुळे या दोन्ही ठिकाणचा भाजपाचा सत्तेतील सहभाग संपुष्टात आला़ दुसरीकडे जिल्ह्यात एकमेव ताब्यात असलेली परभणी पंचायत समिती काँग्रेसने गमावली़ त्यामुळे आता या पक्षाकडे जिल्ह्यात एकही पं़स़ नाही़
चार पं़स़ वर राष्ट्रवादीचे निर्वावाद वर्चस्व
४पाथरी, सोनपेठ, जिंतूर व सेलू या चार पंचायत समित्यांमध्ये यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आहे़
४त्यामुळे या निवडणुकीतही या पक्षाची सत्ता अबाधित राहिली़ पाथरी पंचायत समितीमध्ये आ़ बाबाजानी दुर्राणी, सोनपेठ पंचायत समितीमध्ये माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेश विटेकर व सेलू, जिंतूर पंचायत समितीमध्ये माजी आ़ विजय भांबळे यांनी निवडलेले उमेदवार सभापती व उपसभापती पदावर विराजमान झाले़
-सविस्तर वृत्त /हॅलो-४वर