परभणी : वीजचोरी करणाऱ्यास एक वर्षाची कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 11:43 PM2019-04-09T23:43:15+5:302019-04-09T23:43:58+5:30
मीटर बायपास करुन विजेची चोरी करणाऱ्या एका ग्राहकास १ वर्षाची कैद आणि ३ लाख ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.डी.कश्यप यांनी सुनावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मीटर बायपास करुन विजेची चोरी करणाऱ्या एका ग्राहकास १ वर्षाची कैद आणि ३ लाख ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.डी.कश्यप यांनी सुनावली आहे.
महावितरण कंपनीच्या भरारी पथकातील तत्कालीन उपकार्यकारी अभियंता जनार्दन चव्हाण यांनी ७ सप्टेंबर २०११ रोजी दर्गारोड भागातील मीटरची तपासणी केली. तेव्हा पोस्ट कॉलनी येथील रहिवासी जेब राजन नादर यांच्या घरातील वीज मीटरमध्ये छेडछाड केल्याचे निदर्शनास आले. तसेच या मीटरला बायपास करुन वीज चोरी झाल्याचेही निष्पन्न झाले होते. या प्रकरणात तपासणी केली असता आरोपीने ७ हजार ७८५ युनिट विजेचा वापर करुन १ लाख ८३० रुपयांची वीज चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे उपकार्यकारी अभियंता जनार्दन लालू चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन जेब राजन नादर यांच्याविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.डी.कश्यप यांच्या न्यायालयासमोर झाली. साक्षीपुराव्याअंती वीज चोरी सिद्ध झाल्याने आरोपी नादर यास १ वर्षाची कैद आणि ३ लाख ५ हजार रुपयांची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास ९ महिन्यांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक शिवाजी इंदुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता जनार्दन चव्हाण यांनी प्रयत्न केले. सरकारी वकील के.एस. जोशी यांनी महावितरणची बाजू मांडली.