परभणी : १४ योजनांचा वीज पुरवठा केला खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:41 AM2018-03-14T00:41:44+5:302018-03-14T00:41:49+5:30
तालुक्यात महावितरणच्या वतीने मार्चएंडच्या तोंडावर वीज बिल वसुली मोहीम सुरू आहे़ आतापर्यंत तालुक्यातील १४ पाणीपुरवठ्याची वीज जोडणी तोडण्यात आली आहे़ त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़
लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत : तालुक्यात महावितरणच्या वतीने मार्चएंडच्या तोंडावर वीज बिल वसुली मोहीम सुरू आहे़ आतापर्यंत तालुक्यातील १४ पाणीपुरवठ्याची वीज जोडणी तोडण्यात आली आहे़ त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे़
मानवत तालुक्यामध्ये ४९ ग्रामपंचायती आहेत़ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पाणीपुरवठा योजनांकडे वीज बिलाची लाखो रुपयांची थकबाकी आहे़ महावितरणच्या वतीने तालुकाभरात वीज बिल वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे़
तालुक्यातील देवलगाव, कोल्हा, रुढी, नरळद, खरबा, हत्तरवाडी, उक्कलगाव, सावरगाव, केकरजवळा, रामपुरी, रामेटाकळी, इटाळी, बोंदरवाडी, कोल्हावाडी, गोगलगाव, आंबेगाव, थार, पिंपळा, जंगमवाडी, आटोळा, मंगरुळ पा़प़, कोथाळा, सारंगापूर तर मानवत विभागांतर्गत येणाºया पाथरी तालुक्यामधील दोन गावांमध्ये सार्वजनिक नळ पाणीपुरवठा योजनेद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठा करण्यात येतो़
महावितरणच्या वतीने ऐन उन्हाळ्याच्या तोंडावरच वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे़ त्याचा फटका वीज बिल थकलेल्या ग्रामपंचायतींना बसला आहे़
वीज बिलाचा भरणा न करणाºया खरबा, उक्कलगाव, सावरगाव, केकरवळा, रामपुरी बु़, रामेटाकळी, इटाळी, बोंदरवाडी, कोल्हावाडी, थार, पिंपळा, जंगमवाडी, आटोळा, सारंगापूर या ग्रामपंचायतींचा वीज पुरवठा महावितरणने तोडला आहे़ वीज पुरवठा तोडल्याने या गावामध्ये ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़
या गावातील पाणीपुरवठा योजनेकडे २८ लाख १७ हजार ६२१ रुपये थकले आहेत़ दरम्यान, यापूर्वी वीज पुरवठा तोडलेल्या देवगाव, कोल्हा, रुढी, नरळद, हत्तलवाडी, गोगलगाव, आंबेगाव, मंगरुळ पा़प़, कोथाळा या ग्रामपंचायतींनी काही रक्कम भरून वीज पुरवठा सुरळीत केला आहे़ त्यामुळे या गावांमध्ये सध्या तरी पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे़ मात्र वीज पुरवठा तोडलेल्या गावांमध्ये ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़
विद्यार्थ्यांना नाहक त्रास : अभ्यासावर परिणाम
महावितरणच्या वतीने दरवर्षी मार्च महिन्यातच वीज बिल वसुली मोहीम राबविली जाते़ ग्राहकांकडे अनेक वर्षांची थकबाकी असताना ऐन मार्च महिन्यात वसुली करण्यात येत आहे़ फेब्रुवारी, मार्च महिन्यामध्ये दहावी, बारावी, पदवीच्या परीक्षा घेण्यात येतात़ याच काळामध्ये वीज पुरवठ्याची आवश्यकता विद्यार्थ्यांना असते़ नेमके याच काळात महावितरणच्या वतीने वसुली मोहीम राबविण्यात येत आहे़ त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे़ वर्षभर महावितरणला वसुली मोहीम राबविण्यासाठी वेळच मिळत नाही का, असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांमधून केला जात आहे़ ग्रामस्थांना पाणी मिळावे, यासाठी उन्हाळ्यामध्ये शासनाच्या वतीने लाखो रुपये खर्च केले जातात़ असे असताना महावितरण पाणीपुरवठ्याची जोडणीही खंडित केली जात आहे़ त्यामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे़ वर्षभरामध्ये महावितरणने थकबाकी वसुली मोहीम राबविली असती तर ग्राहक व विद्यार्थ्यांनाही फटका बसला नसता़ परंतु, वेठीस धरण्यासाठीच ही कारवाईची मोहीम राबविली जाते की काय, अशी शंका निर्माण होत आहे़
सिरकळसचा वीजपुरवठा तीन दिवसांपासून बंद
ताडकळस- पूर्णा तालुक्यातील सिरकळस येथील वीज पुरवठा महावितरणने ३ दिवसांपासून बंद केला आहे़ सिरकळस येथील ११० ग्राहकांपैकी १०३ ग्राहकांकडे थकबाकी आहे़ वीज बिल भरणा न केल्यामुळे संपूर्ण गावाचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे़