परभणी : खुल्या प्रवर्गातील महिला होणार अध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 01:05 AM2019-11-20T01:05:04+5:302019-11-20T01:05:42+5:30

येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाल्याने आतापासूनच सत्ताधारी राष्ट्रवादीसह काँग्रेस व शिवसेनेतील अनेक इच्छुकांनीही निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.

Parbhani: President to be open class woman | परभणी : खुल्या प्रवर्गातील महिला होणार अध्यक्ष

परभणी : खुल्या प्रवर्गातील महिला होणार अध्यक्ष

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाल्याने आतापासूनच सत्ताधारी राष्ट्रवादीसह काँग्रेस व शिवसेनेतील अनेक इच्छुकांनीही निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.
राज्यातील ३३ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी मंगळवारी मुंबई येथे आरक्षण सोडत काढण्यात आली. यामध्ये परभणी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी सुटले आहे. त्यामुळे राज्यमंत्रीपदाचा दर्जा असलेल्या या पदासाठी जिल्हा परिषदेत चांगलीच चुरस पहावयास मिळणार आहे. जिल्हा परिषदेत सद्यस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून भाजपा सत्तेत सहभागी आहे. राज्यस्तरावरील गणिते पाहता जिल्हा परिषदेत महाशिवआघाडी सत्तेत येईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. असे असले तरी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेते, यावर बरेच अवलंबून राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे २४ सदस्य संख्या असून ५४ सदस्यांच्या सभागृहात बहुमतासाठी यापक्षाला ४ सदस्यांची आवश्यकता आहे. अडीच वर्षांपूर्वी काँग्रेस- राष्ट्रवादीत जिल्ह्यात प्रचंड मतभेद असल्याने राष्ट्रवादीने काँग्रेसला बाजुला ठेवून ५ सदस्य संख्या असलेल्या भाजपाला सत्तेत सहभागी करुन घेतले होते. शिवाय १ सभापतीपदही भाजपाला देण्यात आले होते. राज्यात भाजपाचे सरकार असल्याने या सभापतीपदाचा मुंबईतून निधी आणताना उपयोग होईल, असा या मागे राष्ट्रवादीचा उद्देश असला तरी त्याचा काडीमात्र फायदा अडीच वर्षात झाला नाही. कारण कोणत्याही प्रकारचा विशेष निधी राज्य सरकारने जिल्हा परिषदेला दिला नाही. त्यामुळे नियमित निधीवरच जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना कामकाज करावे लागले. आता राज्यातील भाजपाचे सरकार पायउतार झाले असून शिवसेना- राष्ट्रवादी- काँग्रेसची महाशिवआघाडी सत्तेत येण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळेच जिल्हा परिषदेतही महाशिवआघाडीचा पॅटर्न अस्तित्वात येतो की काय? अशी चर्चा जि.प. वर्तूळात होताना पहावयास मिळत आहे. याला कारणीभूतही गेल्या काही दिवसांतील राजकीय घडामोडी ठरल्या आहेत. प्रारंभी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अशोक काकडे व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव यांनी राज्यात महाशिवआघाडीची चर्चा सुरु असताना एकमेकांना पेढे भरविले होते. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेचे आ.डॉ.राहुल पाटील यांनी पाथरी येथे राष्ट्रवादीचे आ. बाबाजानी दुर्राणी यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर आ.दुर्राणी यांनी त्यांचे जोरदार स्वागत करुन महाशिवआघाडीची चाहूल लागण्याचे संकेत दिल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. प्रत्यक्षात काय होईल, हे जि.प. अध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळी स्पष्ट होणार आहे. जिंतूरचे राष्ट्रवादीचे माजी आ.विजय भांबळे यांचे सर्वाधिक म्हणजे १३ सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. सध्या अध्यक्षपदही त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे भांबळे यांची या संदर्भात महत्वपूर्ण भूमिका राहणार आहे. त्यामुळे जि.प. अध्यक्षपदाच्या निवडीत दुर्राणी- भांबळे जो निर्णय घेतील त्यानुसारच पुढील सूत्रे हलणार आहेत. शिवाय यावरुनच जि.प.त महाशिवआघाडी होईल की नाही, याचेही भवितव्य ठरणार आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे अंतर्गत मतभेद जवळपास मिटल्यात जमा आहेत. त्यामुळे हे तिन्ही पक्ष खरोखरच एकत्र येऊन महाशिवआघाडी स्थापन करतात की शिवसेनेला बाजूला ठेवून काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
सभागृहातील पक्षीय बलाबल : ठरणार महत्त्वपूर्ण
४जिल्हा परिषदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे २४, शिवसेनेचे १३, काँग्रेसचे ६, भाजपाचे ५, रासपचे ३ आणि अपक्ष व इतर ३ असे एकूण ५४ सदस्य आहेत. बहुमतासाठी २८ सदस्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला एकहाती सत्ता स्थापन करता येत नाही. याकरीता इतर राजकीय पक्षाची मदत घ्यावी लागणार आहे. अडीच वर्षापूर्वी राष्ट्रवादीने भाजपाची मदत घेतली होती. आता शिवसेना व काँग्रेस सोबत महाशिवआघाडी केल्यास तिन्ही पक्षांचे एकूण ४३ सदस्य होतील. त्यामुळे जिल्हा परिषदेत तगडा विरोधकच राहणार नाही.
४काँग्रेस-राष्ट्रवादीचीच आघाडी झाल्यास ३० सदस्यांच्या संख्याबळावर सभागृहात आघाडीचे बहुमत होऊ शकते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी झाल्यास ३७ सदस्यांसह तगडे बहुमत सभागृहात होऊ शकते; परंतु, शिवसेनेत खा. बंडू जाधव आणि आ.डॉ.राहुल पाटील असे दोन गट आहेत. आ.पाटील यांचे राष्ट्रवादीच्या नेत्यांशी सौख्य आहे; परंतु, खा.जाधव यांच्याशी राष्ट्रवादीच्या नेत्यांचे तीव्र मतभेद आहेत. त्यामुळे महाशिवआघाडी स्थापन्यात या माध्यमातून अडथळाही निर्माण होऊ शकतो.
अध्यक्षपदासाठी अनेक जण इच्छुक
४जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित झाल्याने या पदासाठी अनेक जण इच्छुक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जि.प.उपाध्यक्षा भावनाताई नखाते, वस्सा जि.प.गटाच्या सदस्या शालिनीताई राऊत, रवळगाव गटातील इंद्रायणी रोडगे, शेळगाव गटाच्या सदस्या निर्मलाताई विटेकर, कासापुरी गटाच्या सदस्या मिराताई टेंगसे या इच्छुक आहेत.
४ काँग्रेसकडून दैठणा गटाच्या सदस्या शोभाताई रामभाऊ घाटगे तर शिवसेनेकडून लिंबा गटाच्या सदस्या वसुंधराताई घुंबरे या इच्छुक आहेत. ही प्रमुख इच्छुकांची नावे आहेत. अन्य काही सदस्याही या पदासाठी ऐनवेळी अर्ज दाखल करु शकतात.
जिंतूर- पाथरी विधानसभा मतदारसंघातच
पदे राहणार
४जिंतूर- सेलू तालुक्यात एकूण १३ सदस्य राष्ट्रवादीचे आहेत. सध्या जि.प. अध्यक्षपदही जिंतूरकडे तर उपाध्यक्षपद पाथरीकडे आहे. आता नवीन आरक्षणानंतर अध्यक्षपद जिंतूरकडे किंवा पाथरी विधानसभा मतदारसंघाकडे राहू शकते. माजी जि.प.अध्यक्ष राजेश विटेकर हे त्यांच्या आई निर्मलाताई विटेकर यांना अध्यक्षपद मिळावे, याकरीता कसोशीने प्रयत्न करतील. तर माजी आ.विजय भांबळे हे जिंतूरकडेच अध्यक्षपद रहावे, याकरीता शर्तीने प्रयत्न करतील. या संदर्भातील निर्णय थेट पक्षश्रेष्ठींकडूनच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्ष ही दोन्ही पदे या दोन विधानसभा मतदारसंघात राहणार हे जवळपास निश्चित असल्याचे समजते.

Web Title: Parbhani: President to be open class woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.