परभणी : आत्मदहनापासून शिक्षिकेस रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 01:08 AM2019-01-28T01:08:41+5:302019-01-28T01:09:14+5:30
प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमा दरम्यान आत्मदहन करण्यासाठी पेट्रोलची बाटली घेऊन आलेल्या एका शिक्षिकेस पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमा दरम्यान आत्मदहन करण्यासाठी पेट्रोलची बाटली घेऊन आलेल्या एका शिक्षिकेस पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.
अहेमदी सिद्दीकी असे या महिलेचे नाव आहे. अहेमदी सिद्दीकी या दर्गारोड परिसरातील मॉडेल उर्दू स्कूलमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. नियमानुसार शाळेच्या मुख्याध्यापक पदासाठी पात्र असतानाही संस्थाचालकांनी त्यांची नियुक्ती केली नाही.
या संदर्भात विचारणा केली असता त्यांना शाळेतून बडतर्फ करण्यात आले. त्यामुळे तीन वर्षांपासून अहेमदी सिद्दीकी मानसिक व आर्थिकदृष्ट्या चिंतेत होत्या. या प्रश्नी न्याय मिळावा, यासाठी सिद्दीकी यांनी मुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे पत्र देऊन प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
या इशाºयानुसार २६ जानेवारी रोजी त्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाल्या. पोलिसांना माहिती मिळताच अहेमदी सिद्दीकी यांना ताब्यात घेतले. त्यामुळे अनर्थ टळला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे काही वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात अहेमदी सिद्दीकी यांच्यावर प्रतिबंधकात्मक कारवाई करुन त्यांना सोडून देण्यात आले.