परभणी : सालगड्यांचे भाव सव्वालाखांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2019 11:14 PM2019-04-06T23:14:36+5:302019-04-06T23:14:53+5:30

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सालगडी ठरविले जातात़ यावर्षी सालगड्याचे भाव ९० हजार ते सव्वालाखांपर्यंत पोहचल्याने शेतीमालक चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.

Parbhani: The prices of slugs | परभणी : सालगड्यांचे भाव सव्वालाखांवर

परभणी : सालगड्यांचे भाव सव्वालाखांवर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
सोनपेठ (परभणी) : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सालगडी ठरविले जातात़ यावर्षी सालगड्याचे भाव ९० हजार ते सव्वालाखांपर्यंत पोहचल्याने शेतीमालक चिंतेत असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यातून गोदावरी व वाण नदी वाहते. तसेच मुदगल बंधारा व माजलगाव कालव्याचे पाणी सिंचनासाठी उपलब्ध आहे; परंतु, अलीकडच्या काळात पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. परिणामी तालुक्यात दुष्काळाचे सावट कायम आहे. निसर्गाच्या लहरीपणाने शेती करणे अवघड झाले आहे. त्यातच शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. ज्या शेतकऱ्यांकडे १० एकरच्या वर शेती आहे, तो शेतकरी शेती कसण्यासाठी गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर सालगडी ठेऊन वर्षभर शेती करीत असतो़ मागील वर्षी सालगड्यांचे भाव ७५ ते ८५ हजार रुपयांपर्यंत होते; परंतु, यावर्षी सालगाड्यांच्या भावात घसघशीत वाढ झाली आहे़ ९० हजार ते सव्वालाख रुपयांपर्यंत साल मागितले जात आहे. नापिकी व दुष्काळातून शेतकरी अद्याप बाहेर आला नाही. त्यातच सालगड्यांचे भाव हे सव्वालाखापर्यंत पोहचल्याने शेतीमालक चिंताग्रस्त झाले आहेत़
यावर्षी रबी हंगाम झाला नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागला़ गुढी पाडव्यापासून शेतावर काम करणाºया सालगड्याचे साल ठरविण्याची परंपरा रुढ आहे़ या परंपरेनुसार शनिवारी ग्रामीण भागात ठिक ठिकाणी सालगाड्यांचे साल ठरविण्यात आले़
तब्बल सहा महिन्यांपासून शेतीमध्ये काम उपलब्ध नसल्याने पुढील वर्षीच्या हंगामात सालगड्यांचे भाव कमी होतील, अशी अपेक्षा होती़ शेतकरीही आर्थिक कचाट्यात असल्याने यातून तडजोड निघेल, असाही सूर होता़ परंतु, सालाने शेती करण्यासाठी सालगडीच मिळत नसल्याने भाव वधारले आहेत़ ज्या शेतकऱ्यांकडे पूर्वीचे सालगडी होते, ते कामाच्या शोधात शहरी भागात गेले आहेत़ त्यामुळे ग्रामीण भागात सालगडी ठरविताना शेतकºयांना कसरत करावी लागली़ अनेक ठिकाणी शेतकºयांनी जास्तीचे पैसे मोजून शेतीचे साल निश्चित केले आहे़ सालगाड्यांचा भाव तर वाढलाच आहे़ तसेच नगदी रक्कम देण्याबरोबरच धान्याचीही मागणी सालगड्याकडून होत असल्याने शेतकºयांसमोर पुढील हंगामातील उत्पन्नाचेही संकट उभे टाकले आहे़
शेती कसण्यास : बटईची पद्धत
४खरीप हंगामाला जुलै महिन्यापासून सुरुवात होत असली तरी त्याचे नियोजन गुढी पाडव्याच्या दिवशीच केले जाते़ वर्षभर शेती करण्यासाठी मजूर, सालगड्यांचे भाव ठरविले जातात़ स्वत: घरी शेती करताना सालगडी ठेवला जातो़ परंतु, शेती करणाºया मजुरांची मानसिकता शहरी भागात काम करण्याची असल्याने आणि सालगडी ठरविणे परवडत नसल्याने अनेकांनी बटईने शेती देण्याचा पर्याय निवडला आहे़ यामध्ये शेती करीत असताना झालेल्या उत्पन्नात ठराविक हिस्सा देऊन समोरच्या व्यक्तीला शेती बटाईने दिली जाते़ यात शेतकºयांना तोटा होण्याची शक्यता कमी असल्याने आणि इतर अडचणीही दूर होत असल्याने बटाईचा पर्याय निवडला जात आहे़
शेतीत काम करण्यास सध्या कोणी पुढे येत नाही. त्यामुळे मजूरच मिळत नाहीत. वर्षभर शेती कसण्यासाठी सालगडी मिळणे मुश्कील बनले आहे. त्यातून सालगड्यांचे भाव सव्वालाखावर पोहचले आहेत.

Web Title: Parbhani: The prices of slugs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.