परभणी : प्राथमिक पदवीधर शिक्षकांची समुपदेशन प्रक्रिया बारगळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 11:09 PM2019-07-04T23:09:22+5:302019-07-04T23:09:55+5:30
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक पदवीधर शिक्षकांची गुरुवारी येथे आयोजित करण्यात आलेली समूपदेशन प्रक्रिया शिक्षकांनी केलेल्या तक्रारीमुळे बारगळली. आता शुक्रवारी ही प्रक्रिया तालुकास्तरावर घेण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक पदवीधर शिक्षकांची गुरुवारी येथे आयोजित करण्यात आलेली समूपदेशन प्रक्रिया शिक्षकांनी केलेल्या तक्रारीमुळे बारगळली. आता शुक्रवारी ही प्रक्रिया तालुकास्तरावर घेण्यात येणार आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक पदवीधरचे जवळपास २५० शिक्षक जिल्ह्यात अतिरिक्त ठरले आहेत. या शिक्षकांचे समूपदेशन करुन त्यांचे समायोजन करण्याची प्रक्रिया गुरुवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात शिक्षक व त्यांचे नातेवाईक जिल्हा परिषदेत दाखल झाले होते. सभागृहातील जागा यासाठी कमी पडल्याने एकच गोंधळ झाला. त्यानंतर या प्रक्रियेवरच अनेक शिक्षकांनी आक्षेप नोंदविला. १७ जूनपासून शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली आहे. गेल्या महिन्यातच शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यावेळीच समानीकरण व त्यानंतर बदल्या अशी प्रक्रिया राबविली गेली नाही. त्यामुळे जवळपास २५० शिक्षक अतिरिक्त ठरले. त्यामुळे या अतिरिक्त शिक्षकांची अन्यत्र पदस्थापना करणे सुरु करण्यात आले. यासाठी गणित व विज्ञान प्रथम क्रमांक त्यानंतर भाषा विषय द्वितीय क्रमांक व सामाजिक शास्त्र तृतीय क्रमांक असा प्राधान्यक्रम ठरविण्यात आला. या प्रक्रियेला शिक्षकांचा विरोध नव्हता; परंतु, अतिरिक्त ठरलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या यादीत सलग तीन वर्षापासून बदली झालेल्या शिक्षकांचीही नावे आली. यामध्ये गेल्या महिन्यातच बदली झालेल्या काही शिक्षकांचा समावेश आहे. त्यामुळे वारंवार बदलीमुळे कंटाळलेल्या शिक्षकांनी आक्षेप नोंदवित संताप व्यक्त केला. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण झाला. परिस्थिती हाताबाहेर जाईल, असे समजून जिल्हा परिषद प्रशासनाने ही प्रक्रिया स्थगित करुन तालुकास्तरावर घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ही प्रक्रिया होणार आहे. विशेष म्हणजे तालुकास्तरावर अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांना पुन्हा ७ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेत समायोजनासाठी बोलविण्यात आले आहे. सातत्याने होणाºया या बदली प्रक्रियेमुळे शिक्षक अस्वस्थ झाले असून त्याचा विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत आहे.
शासन निर्णयाकडे जिल्हा परिषद प्रशासनाचा कानाडोळा
४राज्य शासनाने २७ फेब्रुवारी २०१८ रोजी काढलेल्या शासन निर्णयात एकदा बदली झालेल्या शिक्षकांची तीन वर्षात पुन्हा बदली करु नये, असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे; परंतु, जिल्हा परिषद प्रशासन मात्र या निर्णयाकडे कानाडोळा करुन मनमानी पद्धतीने निर्णय घेत असल्याची तक्रार शिक्षकांनी केली.
४विशेष म्हणजे जून महिन्यामधील बदल्यांमध्ये एका शाळेवर भाषा विषयांचे दोन-दोन शिक्षक बदलीने नियुक्त करण्यात आले. आता तेथील एक शिक्षक अतिरिक्त ठरल्याच्या कारणावरुन त्याची बदली अन्यत्र केली जात आहे, अशीही शिक्षकांची तक्रार आहे.
२८ माध्यमिक शिक्षकांचे समायोजन
४प्राथमिक पदवीधर शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया गुरुवारी बारगळली असली तरी दुपारनंतर माध्यमिकच्या २८ शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया घेण्यात आली. यासाठी वेळ लागल्याने ती पुर्ण होऊ शकली नाही. शुक्रवारी उर्वरित प्रक्रिया होणार आहे.