परभणी : खळी येथे मिरवणुकीत दोन गटांत वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 12:47 AM2018-09-10T00:47:24+5:302018-09-10T00:47:59+5:30
पोळा सणाच्या निमित्ताने काढलेल्या बैलांच्या मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरुन वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तणाव निवळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड (परभणी) : पोळा सणाच्या निमित्ताने काढलेल्या बैलांच्या मिरवणुकीत नाचण्याच्या कारणावरुन वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास घडली. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर तणाव निवळला.
तालुक्यातील खळी येथे पोळ्यानिमित्त मानाचे बैल फिरविल्यानंतर गावातील काही तरुणांनी बॅन्ड लावून त्यांच्या बैलांची मिरवणूक काढली. सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास गावातीलच एका तरुणाला मिरवणुकीत नाचण्याचा आग्रह करण्यात आला; परंतु, या तरुणाने नाचण्यास नकार दिला. यातून वाद उद्भवला. त्याचे पर्यवसन दोन गटातील हाणामारीत झाले. गावात सायंकाळच्या सुमारास युवकांच्या दोन गटात हाणामारी झाल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. ज्येष्ठ नागरिक व प्रतिष्ठीतांनी मध्यस्थी करुन वाद मिटविण्याचा प्रयत्नही केला. मात्र दोन्ही गट ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे तणाव वाढत चालला होता. तेव्हा खळी येथे कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी दत्तराव पडोळे, गणेश वाघ यांनी गंगाखेड पोलीस ठाण्याला घटनेची माहिती दिली. गंगाखेड येथून पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब मगरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोईनोद्दीन पठाण, जमादार शिवाजी मोरे, प्रदीप सपकाळ, नरसिंग शेल्लाळे हे काही वेळातच खळी येथे पोहचले. दोन्ही गटातील तरुणांची बैठक रमेशराव पवार यांच्या निवासस्थानी घेण्यात आली. युवकांची समजूत काढून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले. त्यानंतर गावातील तणाव निवळला.